कोपरगावात पीएम आवास 2.0 ला वेग; ४८ घरकुलांना मंजुरी-नगराध्यक्ष पराग संधान

कोपरगावात पीएम आवास 2.0 ला वेग; ४८ घरकुलांना मंजुरी-नगराध्यक्ष पराग संधान

PM Awas 2.0 Gains Momentum in Kopargaon; 48 Houses Approved — Council President Parag Sandhan

१६ मार्चला लाभार्थ्यांच्या हाती मंजुरीपत्रे; पहिल्या टप्प्यात ११ जणांच्या खात्यात प्रत्येकी १ लाख जमा 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 13 Fir.19.10 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : शहरातील घरकुलाच्या स्वप्नाला अखेर प्रत्यक्ष आकार येऊ लागला आहे. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील ४८ पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असून येत्या १६ मार्च २०२६ रोजी या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली.

शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना पी एम ए वाय यू ७६व्या 2.0 ला  कोपरगावमध्ये गती मिळाली आहे. आवासन व शहरी कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या अधिपत्याखाली झालेल्या पीएमएवाय-यूच्या ७६ व्या व पीएमएवाय 2.0 च्या ६ व्या केंद्रीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत कोपरगावातील ४८ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.

नगराध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या या दूरदृष्टीच्या योजनेमुळे शहरातील अनेक मजूर आणि गरजू कुटुंबांना स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळत आहे. त्यानुसार शहरातील ५३ लाभार्थ्यांपैकी ११ लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी १ लाख रुपये प्रमाणे एकूण 11 लाख रुपयांचा निधी ११ मार्च २०२६ रोजी वर्ग करण्यात आला आहे. या निधीमुळे संबंधित लाभार्थ्यांच्या घरबांधणीच्या पहिल्या टप्प्याला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

उर्वरित लाभार्थ्यांनाही बांधकामाच्या प्रगतीनुसार पुढील टप्प्यांमध्ये अनुदान देण्यात येणार असल्याचे संधान यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोपरगाव शहरातील घरकुल उभारणीच्या कामांना वेग येणार असून अनेक कुटुंबांना सुरक्षित निवाऱ्याचा आधार मिळणार आहे.

दरम्यान, कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नावनोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू आहे. स्वतःच्या मालकीची जागा असलेल्या नागरिकांना बीएलसी घटकांतर्गत (Beneficiary Led Construction) अर्ज करता येणार असून पात्र प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्ष संधान यांनी सांगितले.

या योजनेमुळे शहरातील गरीब व मजूर कुटुंबांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर उभारण्याचे स्वप्न पूर्ण होईल आणि कोपरगावमध्ये घरकुल उभारणीच्या कामाला नवी गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

You cannot copy content of this page