कोपरगावात थकीत मालमत्ता करावर ५० टक्के शास्ती माफी;मुख्याधिकारी सुहास जगताप
50% Waiver on Penalties Outstanding Property Tax in Kopargaon -Chief Officer Suhas Jagtap
३१ मार्च २०२६ पर्यंत कर भरल्यास अभय योजनेचा लाभ;
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 13 Fir.19.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :कोपरगाव नगरपरिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रोत्साहनात्मक अभय योजनेला जिल्हाधिकारी कार्यालयाची मंजुरी मिळाली असून, थकीत करदात्यांना शास्तीवर ५० टक्के माफी दिली जाणार आहे, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली.
नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ करून कर वसुलीस चालना देण्यासाठी अभय योजना राबविण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार कोपरगाव नगरपरिषदेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास जिल्हाधिकारी डॉ. पंकज ओशियों यांनी मंजुरी दिली आहे.
मुख्याधिकारी जगताप यांनी सांगितले की, ३१ मार्च २०२५ पर्यंत थकीत असलेल्या मालमत्ता करावरील एकूण शास्ती रक्कम सुमारे १ कोटी ८३ लाख ९३ हजार ४५५ रुपये आहे. या शास्ती रकमेपैकी ५० टक्के म्हणजे सुमारे ९१ लाख ९६ हजार ७२८ रुपये इतकी माफी देण्यास परवानगी मिळाली आहे.
मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंतचा सर्व थकीत मालमत्ता कर नागरिकांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत भरल्यासच ५० टक्के शास्ती माफी लागू होणार आहे. तसेच ही योजना फक्त एकदाच लागू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नगरपरिषद प्रशासनाकडून लवकरच नागरिकांना या योजनेची माहिती देऊन कर थकबाकीदारांना पुढे येण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. थकीत कर भरण्यासाठी ही योजना मोठी संधी असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी केले.
या योजनेमुळे कर वसुलीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Post Views:
2






