“रयत शिक्षण संस्थेने राजकारणा पलीकडे विचार करण्याची गरज” – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
“The Rayat Shikshan Sanstha needs to think beyond politics.” – Minister Radhakrishna Vikhe Patil
कोचिंग क्लासेस म्हणजे पालकांची लूट; कौशल्याधारित शिक्षणाची गरज-शिक्षण क्षेत्रातील बदलते वास्तव आणि संस्थांची घसरती प्रतिमा यावर रोखठोक भाष्य करत शिक्षण व्यवस्थेला आरसा दाखवला
कोपरगाव :एकेकाळी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गरिबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि “स्वावलंबन हेच शिक्षण” या संकल्पनेतून उभारलेली रयत शिक्षण संस्थेने रयत शिक्षण संस्थेने राजकारणापलीकडे विचार करण्याची गरज” असल्याची परखड टीकाराज्याचे जलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या बदलत्या वास्तवावर टिप्पणी”करत शिक्षण क्षेत्रातील बदलते वास्तव आणि संस्थांची घसरती प्रतिमा यावर त्यांनी रोखठोक भाष्य करत अनेकांना अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित केले.
अशोकराव अण्णा रोहमारे यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन व ग्रंथतुला सोहळ्यात नामदार विखे बोलत होते.
के.जे सोमय्या-के.बी.रोहमारे महाविद्यालयाच्या पटांगणात झालेल्या या शानदार विलोभनीय सोहळ्यास नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी नामदार सौ शालिनीताई विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,ॲड.संजीव कुलकर्णी, सोहळा समितीचे अध्यक्ष काका कोयटे संपूर्ण रहमारे परिवार शहरातील विविध स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
“एस.एस.जी.एम.मध्ये कधीकाळी रांगा, आता उलटी गंगा”
येथील कार्यक्रमात बोलतांना ना. राधाकृष्ण विखे यांनी शिक्षणातील स्पर्धा आणि संस्थांची घसरती गुणवत्ता यावर भाष्य केले. “एकेकाळी एस. एस. जी. एम कॉलेजमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागत होत्या. नंबर लागला नाही तरच विद्यार्थी के.जे. सोमय्या कॉलेजचा विचार करायचे. पण आता परिस्थिती उलटी गंगा झाली आहे. आधी सोमय्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी गर्दी होते आणि मिळाला नाही तरच विद्यार्थी एस.एस.जी.एम कॉलेजकडे वळतात,” असे वास्तव त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडले. हे चित्र शिक्षण संस्थांसाठी आत्मपरीक्षणाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
“कोचिंग क्लासेस म्हणजे पालकांची सरळ लूट”
कोचिंग क्लासेसच्या वाढत्या जाळ्यावरही विखे पाटील यांनी जोरदार आसूड ओढले.“कोचिंग क्लासेस म्हणजे पालकांची सरळसरळ लूट आहे.विद्यार्थ्यांना जीवघेण्या स्पर्धेत ढकलून लाखो रुपये उकळले जातात.मुळात अशा कोचिंग क्लासेसची गरजच नसते. दर्जेदार शिक्षण देणे ही महाविद्यालयांची जबाबदारी आहे,”अशी कडवी टीका त्यांनी केली. कोचिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांची होणारी ससेहोलपट थांबविण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“पारंपरिक पदवी नव्हे, कौशल्याधारित शिक्षण गरजेचे”
आजची पारंपरिक आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ही शिक्षण पद्धती कालबाह्य होत चालल्याचे सांगत त्यांनी कौशल्याधारित शिक्षणाची गरज अधोरेखित केली. “फक्त पदवी देणारे नव्हे तर उद्योगाला लागणारे कौशल्य विकसित करणारे शिक्षण आवश्यक आहे. उद्योगाभिमुख शिक्षण दिले नाही तर भविष्यातील पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
सोनेवाडी एमआयडीसीचे उदाहरण
सोनेवाडी एमआयडीसीचा उल्लेख करताना ते म्हणाले, “या ठिकाणी भारताच्या संरक्षण विभागासाठी लागणारे पार्ट्स तयार होणार आहेत. पण अशा उद्योगांसाठी लागणारे कौशल्य असलेले विद्यार्थी आपल्या भागात तयार होत आहेत का, याचा शिक्षण संस्थांनी विचार करायला हवा.” शिक्षण आणि उद्योग यांचा दुवा मजबूत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
संस्कारांबाबत वेगळा दृष्टिकोन
शिक्षणातील ‘संस्कार’ या चर्चेलाही त्यांनी वेगळा दृष्टिकोन दिला. “संस्कार ही शिक्षकांची जबाबदारी नाही. त्यांनी मुलांवर कसले संस्कार करायचे? मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी ही पालकांची आहे आणि ती त्यांनी स्वीकारली पाहिजे,” अशी कानटोचणी त्यांनी दिली.
चौकट : अशोकराव रोहमारे यांच्या कार्याचा गौरव
दरम्यान, अशोकराव रोहमारे यांच्या कार्याचा गौरव करताना विखे पाटील म्हणाले की, “गरीब आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी स्वतःला वाहून घेतले. कोणतीही तडजोड न करता संघर्षातून उभी केलेली त्यांची संस्था निश्चितच गौरवास्पद आहे.” मूकबधिर विद्यालयाची सुरुवात करताना त्याच्या भवितव्याबद्दल शंका होती; मात्र आज ते घेतलेले पाऊल योग्य ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.
कौशल्य शिक्षणाचा जुना वारसा
देशात कौशल्य विकास शिक्षणाची संकल्पना रुजण्यापूर्वीच प्रवरानगर येथे ३०-३५ वर्षांपूर्वी अशा प्रकारचे शिक्षण सुरू केल्याचा दाखला देत त्यांनी पद्मश्री विखे पाटील यांच्या दूरदृष्टीचा उल्लेख केला. शिक्षण संस्थांनी जर खऱ्या अर्थाने कौशल्याधारित आणि दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली, तर कोचिंग क्लासेस आपोआप बंद पडतील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
विखे – रोहमारे तीन पिढ्यांचा स्नेह
अशोकराव रोहमारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना त्यांनी रोहमारे-विखे कुटुंबातील जुने प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते तिसऱ्या पिढीतही कायम असल्याचे नमूद केले. मात्र या निमित्ताने शिक्षण क्षेत्रातील वास्तवावर त्यांनी केलेले भाष्य उपस्थितांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले.
आमदार आशुतोष काळे : ‘अण्णांचे कार्य प्रेरणादायी’
आमदार आशुतोष काळे बोलतांना म्हणाले की, रोहमारे कुटुंब हे सामाजिक जाणिवा जपणारे आणि समाजासाठी सदैव तत्पर असलेले कुटुंब आहे. समृद्ध कुटुंबातून येऊनही अण्णांनी आयुष्यभर गरजू, वंचित आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे उघडी ठेवण्याचे काम केले. विद्यालय, महाविद्यालय आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजात मोलाचे योगदान दिले आहे.
ते पुढे म्हणाले की, अण्णांचे कार्य हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून समाजातील प्रत्येक समस्येबाबत त्यांची जाणीव अत्यंत संवेदनशील आहे. तालुक्यातील एखाद्या रस्त्याची अडचण असो, नागरिकांना होणारा त्रास असो किंवा कोणतीही विकासकामे असोत, अण्णा स्वतः पुढाकार घेऊन त्याबाबत पाठपुरावा करतात. अनेक वेळा लोकांना एखाद्या प्रश्नामुळे त्रास होत असल्याचे कळले की अण्णांचा मला तात्काळ फोन येतो आणि ते विचारतात, “काय चाललंय? लोकांना त्रास होता कामा नये.” अशा प्रकारे ते सातत्याने मार्गदर्शन करत असतात.
आमदार झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळातील एक आठवण सांगताना ते म्हणाले की, राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी रस्त्याच्या कामाबाबत चर्चा करण्यासाठी अण्णांना भेटण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळीही अण्णांचे मार्गदर्शन आणि अनुभव आमच्यासाठी दिशादर्शक ठरले. समाजकारण आणि विकासकामांमध्ये त्यांचे मार्गदर्शन कायम लाभत आले आहे.
अण्णांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य, विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेल्या सुविधा आणि समाजासाठी दाखवलेली बांधिलकी ही प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यामुळे तालुक्याला एक मजबूत शैक्षणिक आणि सामाजिक दिशा मिळाली आहे. अशा कार्यकर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा गौरव होत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
पुढील काळातही अण्णांचे अनुभव, मार्गदर्शन आणि आशीर्वाद आम्हाला लाभत राहावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार आशुतोष काळे यांनी त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
राजेश परजणे : कठीण काळातही त्यांनी धीर सोडला नाही. हेच त्यांचे मोठेपण
राजेश परजणे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, अण्णांनी आयुष्यभर काम करण्याचा ध्यास घेतला आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता तालुक्यात समाजकारण व लोकसेवा केली. त्यांच्या कार्यात प्रामाणिकपणा, जिद्द आणि माणुसकी यांचा सुंदर संगम होता.
दादा गेल्यानंतर कुटुंबावर दुःखाचे सावट आले होते. त्या कठीण काळातही त्यांनी धीर सोडला नाही. हेच त्यांच्या मोठेपणाचे खरे दर्शन होते. स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून इतरांना धीर देण्याची ताकद त्यांच्यात होती.
त्यांनी आयुष्यभर समाज, शिक्षण आणि माणुसकीची सेवा केली. त्यामुळेच आज अनेकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम आहे.
अण्णांनी घालून दिलेला कार्याचा मार्ग, त्यांची जिद्द आणि समाजासाठीची तळमळ हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे.
त्यांचे विचार आणि कार्य पुढील पिढ्यांना दिशा देत राहतील, अशी भावना राजेश परजणे यांनी व्यक्त केली.
काका कोयटे : ‘सहा शतकापासून साडेसहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत’
सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष काका कोयटे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात के.बी. साहेब, खासदार बाळासाहेब विखे पाटील, बी.जे. खताळ पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांचा प्रभाव असलेल्या काळात रोहमारे कुटुंबानेही समाजकारणाची समृद्ध परंपरा जपली. त्या काळातील मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याशी असलेली जवळीक आणि उद्योगपती फिरोदिया व सोमय्या कुटुंबीयांशी असलेले संबंध यामुळे या कुटुंबाचे सामाजिक कार्य अधिक विस्तारले.
अशोक अण्णा, राधाकृष्ण विखे पाटील आणि आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून एकत्र पुढे आलो. अण्णांचे कार्यकर्त्यांवर असलेले प्रेम आणि जिव्हाळा हा वेगळाच होता. राजकारणात येण्याची संधी असूनही त्यांनी शिक्षण क्षेत्राची वाट निवडली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही त्यांना शिक्षण क्षेत्रातच काम करण्याचा सल्ला दिला होता.
त्या मार्गदर्शनानुसार अण्णांनी महाविद्यालयाची धुरा सांभाळली आणि सहाशे विद्यार्थ्यांपासून सुरू झालेले हे शिक्षणसंस्थान आज साडेसहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे. शिक्षण, समाजकारण आणि विकासकामांबाबत त्यांचे मार्गदर्शन आजही आम्हाला लाभत असते. त्यामुळे अशा कार्यकर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा सन्मान हा संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी संस्थेचे सचिव ॲड. संजीव कुलकर्णी यांनी तसेच अशोक अण्णा यांच्या नाती श्रेया संदीप रोहमारे व स्वरा सुदीप रोहमारे यांनी आजोबा बद्दल आपल्या भावना मनोगतुन व्यक्त केल्या.
राजकारणातील पैशामुळे शिक्षणाचा मार्ग निवडला’-अशोक अण्णा रोहमारे
आजच्या या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना सत्कारमूर्ती अशोक अण्णा रोहमारे म्हणाले मी मनापासून एक गोष्ट सांगू इच्छितो की, काळाच्या ओघात राजकारणात पैशाचे वाढते महत्त्व पाहून मी जाणीवपूर्वक शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा मार्ग स्वीकारला. समाजासाठी काहीतरी टिकाऊ आणि अर्थपूर्ण काम करावे, या भावनेतून मी या क्षेत्रात स्वतःला वाहून घेतले. आज उभे असलेले मूकबधिर विद्यालय हे केवळ माझे नव्हे तर अनेक मान्यवरांच्या सहकार्याचे फलित आहे. माजी खासदार कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील आणि खासदार शंकररावजी काळे यांच्या मोठ्या पाठबळामुळे हे विद्यालय आकाराला आले. काळे साहेबांनी प्रदर्शनाची जागा पाच वर्षे वापरासाठी दिली आणि त्या ठिकाणी आम्ही मूकबधिर विद्यालयाची पायाभरणी केली.
त्यावेळी तत्कालीन समाजकल्याण मंत्री राजेंद्रकुमारी वाजपेयी स्वतः येथे आल्या आणि केंद्र शासनाकडून पाच लाख रुपयांची मदत मंजूर झाली. त्यातील शेवटचा हप्ताही काळे साहेबांनी आणून दिला. साई संस्थेचे सूकटणकर साहेब तसेच अनेक सेवाभावी संस्थांनीही या कार्यात सहकार्य केले. या सर्वांच्या मदतीमुळेच हे विद्यालय उभे राहू शकले. आजही त्या विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवताना मला अपार समाधान मिळते. आज माझ्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्तानेही सकाळी सर्वप्रथम आम्ही शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना भेटलो, त्यांच्यासोबत वेळ घालवला आणि जेवणही केले.
ग्रामीण भागात मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी शाळा कशी चालवावी हे पाहण्यासाठी अनेक ठिकाणांहून लोक येथे येत असत, ही माझ्यासाठी मोठी समाधानाची बाब आहे. पुढे संस्थेची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेक विकासकामे करण्याची संधी मिळाली. पुलाच्या कामासाठीही मान्यवरांनी सहकार्य केले. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपेने आणि सर्वसहकाऱ्यांच्या मदतीने आज हे शिक्षणसंस्थान उर्जेने कार्यरत आहे.
या कार्यात मला अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले, त्याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे. आज या ठिकाणी उपस्थित असलेले माझे नातेवाईक, मित्रपरिवार आणि सहकारी यांच्यामुळे मला मोठा आनंद झाला आहे. आपले सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्य असेच लाभत राहो. पुढेही समाजहितासाठी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य निष्ठेने सुरू ठेवण्याचा मी संकल्प व्यक्त करतो.
संदीप रोहमारे : ‘बाप म्हणजे आयुष्याचा दीपस्तंभ’
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक संदीप रोहमारे यांनी आभार व्यक्त करताना आपल्या भावना अत्यंत ओघवत्या शब्दांत मांडल्या. ते म्हणाले, “मी जेव्हा शेतीत नवीन पाऊल टाकले,तेंव्हा डाळिंबाची बाग लावली. डाळिंब हे फळ बाहेरून काटेरी असते; पण आतून गोड रसाने भरलेले असते. अगदी त्याचप्रमाणे आमचे वडील अण्णा बाहेरून कडक भासले तरी अंतःकरणाने अतिशय प्रेमळ आहेत. त्या झाडावरील सुंदर फुल जसे त्याची शोभा वाढवते, तसेच आमच्या आयुष्यात आईचे स्थान आहे. काटेरी जीवनप्रवासात आई-वडिलांनी अनेक संकटे, सुख-दुःख अनुभवत आमच्यासाठी आदर्श उभा केला.”
ते पुढे म्हणाले की, अण्णांच्या आयुष्यात अनेक थोरामोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले. त्यात स्वर्गीय विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण, स्व. बाळासाहेब विखे पाटील, शंकररावजी काळे, नवलमल व अभय फिरोदिया तसेच सोमय्या कुटुंबीयांचा उल्लेख त्यांनी केला. कॉलेजच्या काळात विलासराव देशमुख यांनी अण्णांना दिलेला सल्ला—“राजकारणापेक्षा लोकसेवेचे काम करा”—अण्णांनी मनावर घेतला आणि समाजकारण व शिक्षणसेवेत आयुष्य वाहून घेतले.
अण्णांनी महाविद्यालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेक प्राचार्य, शिक्षक आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने संस्थेचा विकास साधला. चाचणी आणि जवळके येथे महाविद्यालय सुरू करून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दारे खुली केली. तसेच खासदारांच्या मदतीने इंनडोअर गेम हॉल उभारण्यात आला. स्विमिंग पूलची संकल्पना असतानाही पाण्याच्या टंचाईचा विचार करून तो निर्णय बदलण्यात आला आणि आजही इंनडोअर हॉल विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे.
लायन्स क्लबच्या माध्यमातून अण्णांनी मूकबधिर शाळा स्थापन केली. शेतीतही दूरदृष्टी ठेवून त्यांनी शेततळे व डाळिंब बागेचा निर्णय घेतला. त्याचा आज उत्तम परिणाम दिसून येतो. पोहेगाव येथील गणपती मंदिर ट्रस्ट स्थापून धार्मिक व सामाजिक कार्यालाही चालना दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेज कमिटी, काकासाहेबांच्या मार्गदर्शनाखालील समिती, प्राचार्य, शिक्षक, नॉन-टीचिंग कर्मचारी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून परिश्रम घेतले. दूरदूरहून आलेल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि मान्यवरांचेही त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
आपले मनोगत एका भावपूर्ण ओळींनी संपवताना त्यांनी म्हटले—
“बाप म्हणजे जगण्याचं माप, पाठीवरची थाप, संकटातून पार नेणारी होडी आणि आयुष्याच्या समुद्रातील दीपस्तंभ. अशा या वडिलांच्या प्रेरणेनेच आम्ही पुढे चालत आहोत,” अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शैलेंद्र बनसोडे व अनिल गिड्डे यांनी केले. प्राचार्य विजय ठाणगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर सन्मानपत्राचे वाचन प्रा. जिभाऊ मोरे यांनी केले.
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाषणातील रोखठोक ठळक मुद्दे
रयत शिक्षण संस्था राजकारणाच्या विळख्यात?” – विखे पाटील यांचा थेट सवाल
“कोचिंग क्लासेस म्हणजे पालकांची लूट!” – शिक्षण व्यवस्थेवर विखे पाटीलांचा कडक प्रहार
“शिक्षण संस्थांनी राजकारण सोडा; कौशल्याधारित शिक्षण द्या!”- विखे पाटीलांचा इशारा
“रयतची परंपरा कुठे हरवली?”- विखे पाटीलांनी शिक्षण व्यवस्थेला आरसा दाखवला