आरोपांच्या राजकारणाला जनता कंटाळली; विकासाच्या कामांवरच माझा भर – आ. आशुतोष काळे
The public is fed up with the politics of allegations; my focus remains solely on developmental works – MLA Ashutosh Kale
१३.३७ कोटींच्या निधीतून डाऊच, हिंगणी व शिंगवे येथे गोदावरीवरील केटीवेअरजवळ पूरसंरक्षक भिंतींचे भूमिपूजन; शिंगवे जिल्हा परिषद शाळेत संगणक कक्ष
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 16 Sun.19.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :राजकारणात केवळ आरोप-प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष विकासकामे करून दाखविणे अधिक महत्त्वाचे आहे. मागील सहा वर्षांत विकासकामांना गती देत दशकानुदशके प्रलंबित असलेली अनेक कामे पूर्ण केली आहेत. आम्ही विकासाचेच राजकारण करतो आणि जे काम करतो तेच जनतेसमोर मांडतो, असा रोखठोक शब्दांत दावा आमदार आशुतोष काळे यांनी केला.
आपत्ती सौम्यीकरण योजनेअंतर्गत १३.३७ कोटी रुपयांच्या निधीतून कोपरगाव मतदारसंघातील डाऊच, हिंगणी व शिंगवे येथील गोदावरी नदीवरील केटीवेअर परिसरात पूरसंरक्षक भिंती बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच पी.एम. श्री जिल्हा परिषद शाळा शिंगवे येथील आयडियल संगणक कक्ष व गोदावरी इक्युपमेंट्स प्रा. लि. यांच्या वतीने दुरुस्त करण्यात आलेल्या शाळा खोल्यांचे लोकार्पण रविवारी (दि.१५) आमदार काळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.
आ. काळे म्हणाले की, पूर्वी मंजूर झालेल्या बंधाऱ्याच्या देखभालीची जबाबदारी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याकडे देण्याची मागणी केली होती. मात्र संबंधितांकडून नकार देण्यात आल्याने तो बंधारा तीन वेळा वाहून गेला आणि शेतकऱ्यांच्या जमिनींचेही नुकसान झाले. पावसाळ्यात गोदावरी नदीला पूर आल्यावर डाऊच, हिंगणी व शिंगवे परिसरातील बंधाऱ्यांची अशीच अवस्था होऊ नये, यासाठी महायुती शासनाकडून १३.३७ कोटी रुपयांचा निधी आणून संरक्षक भिंतींची कामे हाती घेतली आहेत. या कामांमुळे पूराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि विकासकामांना गती देणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे. निधी मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असतो. मात्र ज्यांचा या कामांशी काहीही संबंध नाही, तेच काम आम्ही केले असा खोटा दावा करत नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, अशी अप्रत्यक्ष टोला त्यांनी विरोधकांना लगावला. नागरिकांनी सुचविलेल्या विकासाच्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
त्यामुळे डाऊच, हिंगणी व शिंगवे येथील ग्रामस्थांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, संचालक, संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
चौकट : पूरसंरक्षणासाठी १३.३७ कोटींची कामे
१३.३७ कोटी रुपयांच्या निधीतून हिंगणी व डाऊच येथे केटीवेअरच्या खालील बाजूस गोदावरी नदीच्या दोन्ही तिरांवर तर शिंगवे (ता. राहाता) येथे उर्ध्व बाजूस नदीच्या उजव्या तिरावर संरक्षक भिंती उभारण्यात येणार आहेत. या कामांमुळे अतिवृष्टीच्या काळात गोदावरीच्या पुराचे पाणी गावात शिरण्यापासून मोठ्या प्रमाणात अटकाव होऊन नागरिकांच्या मालमत्तेचे संभाव्य नुकसान टळणार आहे.
Post Views:
5





