लहरी मान्सून, खतटंचाईच्या सावटात खरीप; शेतकऱ्यांसाठी प्रशासन सज्ज राहावे – आ. आशुतोष काळे
Kharif Season Looms Under the Shadow of an Erratic Monsoon and Fertilizer Shortages; Administration Must Remain Prepared for Farmers – MLA Ashutosh Kale
खरीप हंगाम पूर्वनियोजन बैठकीत कृषी, महसूल, पाटबंधारे विभागाला स्पष्ट निर्देश;“एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये”
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr28Tue 18.20 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :लहरी मान्सून, वेळेवर न पडणारा पाऊस, वाढते तापमान आणि शेतीमालाला मिळणारा अनिश्चित दर यामुळे यंदाचाही खरीप हंगाम संकटाच्या छायेत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी मोठ्या धैर्याने खरीप हंगामाच्या तयारीला लागला असून प्रशासनानेही जबाबदारी ओळखून शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी प्राधान्याने काम करावे, अशा स्पष्ट सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कृषी, महसूल व पाटबंधारे विभागाला दिल्या.
सोमवारी (दि.२७) कोपरगाव पंचायत समिती कार्यालयात खरीप हंगाम पूर्वनियोजन व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या या बैठकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसमोरील संभाव्य अडचणी, खत-बियाण्यांचा पुरवठा, पीक विमा, पाटपाणी नियोजन आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन यावर सविस्तर चर्चा झाली.
आ. काळे म्हणाले, खत निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल परदेशातून आयात केला जात असल्याने जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम खतपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप हंगामात खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागाने आतापासूनच ठोस नियोजन करावे. तालुक्याला अधिकाधिक खतांचा कोटा मिळवून पुरेसा साठा निर्माण करण्यावर भर द्यावा. तसेच बनावट बियाणे व खतांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाढत्या तापमानाचा विपरीत परिणाम शेती व्यवसायावर होत असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी पाटपाण्याचे काटेकोर नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन पेरणी व कापणीसंदर्भातील अधिकृत माहिती शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात महसूल व कृषी सहाय्यकांचा अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मात्र काही वेळा राजकीय हेतूने पात्र शेतकऱ्यांची नावे मदत यादीतून वगळण्याचा प्रयत्न होतो, ही बाब गंभीर असल्याचे सांगत, कोणत्याही दबावाखाली न येता एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
पीक विम्याच्या बाबतीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यास शेतकऱ्यांना वेळेत भरपाई मिळू शकते. त्यामुळे कृषी, महसूल आणि संबंधित सर्व विभागांनी सामूहिक प्रयत्नातून खरीप हंगाम यशस्वी करावा, असे आवाहनही आ. काळे यांनी केले.
या बैठकीस उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, गटविकास अधिकारी संदीप दळवी, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, महाबीजचे कृषी क्षेत्र अधिकारी, सर्व मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी सेवा केंद्र प्रतिनिधी, कृषी सेवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views:
6





