निकृष्ट टरबूज रोपांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; दोषी कंपन्यांवर कारवाई करा-आ.आशुतोष काळे 

निकृष्ट टरबूज रोपांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; दोषी कंपन्यांवर कारवाई करा-आ.आशुतोष काळे 

Substandard Watermelon Saplings Cripple Farmers; Take Action Against Culprit Companies – MLA Ashutosh Kale

सिजेंटा व सिंबा कंपनीविरोधात कृषिमंत्र्यांना निवेदन;नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या

Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 28Tue 18.10 Am.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :रब्बी हंगामात नुकसान झाले तर खरीप हंगामात भरून निघेल, या पिकात नाही परवडले तर पुढच्या पिकात नक्की परवडेल, या आशेवर शेतकरी शेती व्यवसाय करीत असतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणासोबतच काही बियाणे कंपन्यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत असल्याचे चित्र कोपरगाव तालुक्यात समोर आले आहे. निकृष्ट दर्जाच्या टरबूज रोपांमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषिमंत्री ना. दत्तात्रयजी भरणे यांच्याकडे केली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी विविध नर्सरीमधून सिजेंटा व सिंबा कंपनीची टरबूज रोपे खरेदी करून लागवड केली होती. मात्र ही रोपे निकृष्ट दर्जाची असल्याने रोगराईला अजिबात प्रतिकार करू शकली नाहीत. परिणामी अनेक एकरांवरील टरबूज शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

या प्रकरणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने २५ मार्च रोजी प्रत्यक्ष शेतपाहणी केली. या पाहणीत सिजेंटा व सिंबा कंपनीची टरबूज रोपे लावलेल्या सुमारे २५ एकर क्षेत्रातील पिकांचे १०० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल समितीने दिला आहे. तसेच संबंधित कंपन्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आ. आशुतोष काळे यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाची टरबूज रोपे देऊन सिजेंटा व सिंबा कंपनीने त्यांच्या अडचणीत अधिक भर घातली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी.

याबाबत स्वतः जातीने लक्ष घालून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही कृषिमंत्री ना. दत्तात्रयजी भरणे यांनी आ. काळे यांना दिली आहे.

आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने दखल घेऊन आमचे गाऱ्हाणे थेट कृषिमंत्र्यांपुढे मांडल्याने आता निश्चितच सकारात्मक कार्यवाही होईल, असा विश्वास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page