कोपरगाव :जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांमध्ये इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असताना भारताने सक्षम नेतृत्वामुळे ऊर्जा क्षेत्रात स्थैर्य टिकवून ठेवले आहे. इंधन संकटाच्या छायेत संजीवनीचा सीएनजी CNG प्रकल्प ठरतोय आत्मनिर्भरतेचा मार्ग असल्याचे मत कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष व युवानेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.मात्र भविष्यातील संभाव्य आव्हानांचा विचार करता देशाने ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले
भारतामध्ये क्रूड ऑइल तसेच सीएनजीसारख्या इंधनासाठी मोठ्या प्रमाणावर परदेशावर अवलंबून राहावे लागते. विशेषतः स्ट्रीट ऑफ होर्मुझ या महत्त्वाच्या समुद्री मार्गातून मोठ्या प्रमाणात इंधन भारतात आयात केले जाते. गेल्या वर्षभरातील आकडेवारी नुसार जवळपास साडेपाच हजार जहाजांमधून इंधन भारतात आणण्यात आले असून त्यासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामुळे देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी पर्यायी व स्वदेशी ऊर्जास्रोत उभारणे अत्यंत आवश्यक ठरत असल्याचे कोल्हे यांनी नमूद केले.
याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील संजीवनी उद्योग समूहांतर्गत सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने उभारलेला सीएनजी प्रकल्प सहकार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरला आहे. सहकारी तत्वावरील साखर कारखान्यांमध्ये अशा प्रकारचा सीएनजी प्रकल्प सुरू करणारा हा देशातील पहिलाच उपक्रम ठरला असून या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले होते.या प्रकल्पामधून दररोज सुमारे १२ टन सीएनजी उत्पादनाची क्षमता उपलब्ध आहे. या इंधनावर जवळपास तीन हजार वाहनं रोज चालू शकतात. अनेक वाहनांमध्ये ड्युअल फ्यूल प्रणाली असल्यामुळे पेट्रोलसोबत सीएनजीचाही वापर येत असल्याने वाहनचालकांना परवडणारे आणि पर्यावरणपूरक इंधन उपलब्ध होत असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.
ऊसापासून निर्माण होणाऱ्या उपउत्पादनांचा वापर करून तयार होणारे हे इंधन ऊर्जा निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे शेतकरी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जादाता बनत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळत आहे.संजीवनी कारखान्याचा हा प्रकल्प आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे विवेक कोल्हे यांनी सांगितले.
संजीवनी उद्योग समूहाने उपपदार्थ निर्मितीच्या क्षेत्रात नेहमीच आघाडी घेतली आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी पाहिलेली अनेक विकासस्वप्ने आज प्रत्यक्षात साकार होत असल्याची भावना देखील विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली.