युद्धाच्या छायेत गॅसला ‘इथेनॉल’चा पर्याय; विवेक कोल्हे यांचा सरकारला ठोस प्रस्ताव

युद्धाच्या छायेत गॅसला ‘इथेनॉल’चा पर्याय; विवेक कोल्हे यांचा सरकारला ठोस प्रस्ताव

Ethanol as an Alternative to Gas Amidst the Shadow of War: Vivek Kolhe Presents Concrete Proposal to the Government

कमर्शियल LPG ऐवजी इथेनॉल स्टोव्हला परवानगी द्या; देशाची आयात कमी, शेतकऱ्यांना नवी ऊर्जा – कोल्हे यांचे प्रतिपादन

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 16 Mon.17.20 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: जागतिक पातळीवर वाढत्या संघर्षामुळे ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असताना देशातील साखर उद्योगातून एक नवा पर्याय पुढे आला आहे. कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष व युवा नेते विवेक कोल्हे यांनी देशातील इथेनॉल उत्पादन क्षमतेचा सविस्तर अहवाल मांडत कमर्शियल LPG सिलेंडरला पर्याय म्हणून इथेनॉल स्टोव्हला परवानगी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. युद्धजन्य परिस्थितीत आयातीत गॅसवर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी हा मार्ग सरकारने गांभीर्याने विचारात घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील साखर उद्योगाने मोठ्या प्रमाणावर इथेनॉल निर्मितीत गुंतवणूक केली आहे. पेट्रोलमध्ये E-20 म्हणजे २० टक्के इथेनॉल ब्लेंडिंगचा कार्यक्रम पूर्ण झाला असला तरी उद्योगाकडे अजूनही मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षमता उपलब्ध आहे. विविध योजनांमधून जवळपास ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक इथेनॉल प्रकल्पांत झाली असून देशात सुमारे १००० कोटी लिटरपर्यंत अतिरिक्त उत्पादन क्षमता तयार आहे, असा अहवाल कोल्हे यांनी मांडला.

भारताला लागणाऱ्या LPG पैकी सुमारे ६० टक्के गॅस आयात करावा लागतो, त्यातील मोठा भाग पश्चिम आशियातून येतो. त्या प्रदेशातील संघर्षामुळे भविष्यात पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. देशातील हॉटेल, रेस्टॉरंट, हॉस्पिटल केटरिंगसारख्या कमर्शियल क्षेत्रात LPG वापराचा हिस्सा सुमारे १० टक्के आहे. हा वापर इथेनॉल स्टोव्हकडे वळवला तर ५०० ते ६०० कोटी लिटर इथेनॉलचा वापर शक्य होईल, असा ठाम अभ्यास कोल्हे यांनी मांडला.

खर्चाच्या दृष्टीनेही हा पर्याय व्यवहार्य असल्याचे त्यांनी सांगितले. चार जणांच्या स्वयंपाकासाठी लागणारा खर्च LPG आणि इथेनॉलमध्ये जवळपास समान राहतो. मात्र LPG सिलेंडरच्या देशभरातील वाहतुकीवर दरवर्षी २० ते २५ हजार कोटी रुपये खर्च होतात. इथेनॉल स्थानिक पातळीवर उपलब्ध असल्याने हा खर्च आणि त्यातून होणारे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

केनिया सारख्या देशात १५ लाखांहून अधिक घरांमध्ये इथेनॉल स्टोव्हचा वापर सुरू आहे. भारतातही प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविण्यास उद्योग तयार असून सध्या १,००० स्टोव्ह वापरासाठी सज्ज असल्याची माहिती कोल्हे यांनी दिली.

ऊसापासून निर्माण होणाऱ्या इथेनॉलचा वापर वाढला तर ‘अन्नदाता ते ऊर्जादाता’ हा शेतकऱ्यांचा प्रवास अधिक बळकट होईल. युद्धाच्या छायेत उभ्या असलेल्या ऊर्जा संकटावर स्वदेशी उपाय म्हणून हा पर्याय सरकारने गांभीर्याने विचारात घ्यावा, अशी ठाम मागणी विवेक कोल्हे यांनी केली आहे.

चौकट : इथेनॉल स्टोव्ह ठरू शकतो ऊर्जा स्वातंत्र्याचा टर्निंग पॉइंट

विवेक कोल्हे यांनी मांडलेला कमर्शियल LPG ऐवजी इथेनॉल स्टोव्ह वापराचा प्रस्ताव केंद्र सरकारने स्वीकारला, तर देशाच्या ऊर्जा धोरणात मोठी क्रांती घडू शकते.स्वयंपाकासाठी इथेनॉलचा वापर वाढल्यास LPG आयात कमी होऊन परकीय चलनाची मोठी बचत होईल. यामुळे साखर कारखानदारीला नवे बळ, शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ आणि सहकार क्षेत्राला आर्थिक उभारी मिळू शकते. देशाच्या अर्थकारणाला दिशा देत इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा निर्णय ‘गेमचेंजर’ ठरू शकतो, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page