काळेंच्या प्रयत्नांना यश; पोहेगावच्या विजेचा प्रश्न अखेर सुटला

काळेंच्या प्रयत्नांना यश; पोहेगावच्या विजेचा प्रश्न अखेर सुटला

Kale’s Efforts Bear Fruit; Pohegaon’s Electricity Issue Finally Resolved

शहा १३२ के.व्ही. उपकेंद्राशी पोहेगाव सबस्टेशन जोडले; शेतकरी-नागरिकांना मोठा दिलासा

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 16 Mon.18.20 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :पोहेगाव व परिसरातील वर्षानुवर्षे भेडसावत असलेल्या विजेच्या प्रश्नावर अखेर निर्णायक तोडगा निघाला असून आमदार आशुतोष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सिन्नर तालुक्यातील शहा येथील १३२ के.व्ही. वीज उपकेंद्राशी पोहेगाव सबस्टेशन जोडण्याचे लिंक लाईनचे काम पूर्ण झाले आहे. तांत्रिक तपासणी अंतिम टप्प्यात असून लवकरच या मार्गे पोहेगाव व परिसराला अविरत वीजपुरवठा सुरू होणार आहे.

कोपरगाव तालुक्याच्या वीजप्रश्नासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोळपेवाडी येथे १३२ के.व्ही. उपकेंद्र मंजूर करून आणले होते. पुढे २०१४ नंतर हे उपकेंद्र शहा येथे हलविण्यात आले. मात्र या उपकेंद्रावर कोपरगाव तालुक्याचा हक्क कायम ठेवत आमदार आशुतोष काळे यांनी सातत्याने पाठपुरावा करत या सुविधेचा लाभ तालुक्याला मिळवून दिला. शहा उपकेंद्र कार्यान्वित होताच कोळपेवाडी व चासनळी उपकेंद्रे त्यास जोडण्यात आली होती. आता पोहेगाव सबस्टेशनही या साखळीत सामील झाले आहे.

महावितरणकडून शहा ते पोहेगाव या सुमारे २१ किलोमीटर लांबीच्या लाईनची तांत्रिक तपासणी, लोडिंग क्षमता व चार्ज तपासणी पूर्ण झाली असून ३३ के.व्ही. उपकेंद्रातील अंतर्गत कामे अंतिम टप्प्यात आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी मुंबईहून परतताना महावितरण अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या जोडणीमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा, वारंवार रोहित्र जळणे तसेच शेतकऱ्यांचे वीजपंप नादुरुस्त होण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. त्याचबरोबर कोपरगाव उपकेंद्रावरील विद्युतभार कमी होऊन रांजणगाव देशमुख परिसरालाही दिलासा मिळणार आहे.

पोहेगाव व परिसरातील शेतकरी, व्यावसायिक आणि नागरिकांनी विजेचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांचे आभार व्यक्त केले असून या निर्णयामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page