कोपरगावातील ४८ कुटुंबांना घरकुल मंजुरीपत्रांचे वाटप; पुढच्या टप्प्यात ‘सेंच्युरी’ – पराग संधान

कोपरगावातील ४८ कुटुंबांना घरकुल मंजुरीपत्रांचे वाटप; पुढच्या टप्प्यात ‘सेंच्युरी’ – पराग संधान

Approval Letters for Housing Schemes Distributed to 48 Families in Kopargaon; ‘A Century’ in the Next Phase – Parag Sandhan

घरकुल’ स्वप्नाला कोपरगावात नवी उभारी! प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत अडीच लाखांपर्यंत निधी

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 16 Mon.18.30 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :स्वतःच्या हक्काच्या घरासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करणाऱ्या गरजू कुटुंबांच्या स्वप्नांना अखेर कोपरगावात प्रत्यक्ष आकार मिळू लागला आहे. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 (शहरी) अंतर्गत कोपरगाव नगरपरिषदेच्या माध्यमातून ४८ पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. सोमवारी (दि.१६ मार्च) नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्ष पराग संधान यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष पराग संधान यांनी लाभार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत घर बांधण्यासाठी केंद्र शासनाकडून दीड लाख रुपये व राज्य शासनाकडून एक लाख रुपये असा एकूण अडीच लाख रुपयांपर्यंत निधी टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. घरकुल योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता करताना लाभार्थ्यांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी थेट नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधावा. प्रशासन लाभार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील अधिकाधिक गरजवंत कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असून पुढील टप्प्यात सुमारे १०० लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. “घरकुलांच्या संख्येची सेंच्युरी करण्याचा निर्धार आहे,” असेही संधान यांनी स्पष्ट केले. निधी वितरणातील अडथळे टाळण्यासाठी लाभार्थ्यांनी नॅशनलाइज्ड बँकेत खाते उघडण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप यांनी सांगितले की, कोपरगावमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत ३१० घरकुलांचे काम पूर्णत्वास गेले आहे. बीएलसी पद्धतीनुसार लाभार्थ्यांनी स्वतःचे घर बांधायचे असून बांधकामाच्या टप्प्यानुसार निधी खात्यात जमा केला जाणार आहे. निधी मिळाल्यानंतर तो तात्काळ घराच्या बांधकामासाठी वापरून काम वेळेत पूर्ण करावे, असे त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमास उपमुख्याधिकारी पापडीवाल, बांधकाम सभापती निलोफर पठाण, महिला व बालकल्याण समिती सभापती सविताताई मंजुळ, आरोग्य सभापती वैभव आढाव, गटनेते प्रसाद आढाव, नगरसेवक अतुल काले, संतोष शिंदे, अनिल आव्हाड, संजय उदावंत, फिरोज पठाण तसेच पीएमएवाय योजनेचे अधिकारी हर्षवर्धन सुराळकर, विशाल वर्हे आणि नगरपालिका अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

चौकट : घरकुल योजनेची ठळक आकडेवारी

प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत ४८ लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप,केंद्र शासनाकडून:  ₹१.५० लाख,राज्य शासनाकडून : ₹१.०० लाख,लाभार्थ्यांना एकूण ₹२.५० लाखांपर्यंत निधी टप्प्याटप्प्याने,कोपरगावमध्ये आतापर्यंत ३१० घरकुलांचे काम पूर्णपुढील टप्प्यात सुमारे १०० लाभार्थ्यांना घरकुल देण्याचे लक्ष्य- नगराध्यक्ष पराग संधान 

 

Leave a Reply

You cannot copy content of this page