सद्गुणांनी जिंकले जनमानस” – शंकरराव कोल्हे यांच्या स्मृतींना कीर्तनातून अभिवादन

सद्गुणांनी जिंकले जनमानस” – शंकरराव कोल्हे यांच्या स्मृतींना कीर्तनातून अभिवादन

“Won the Hearts of the People Through Virtue” – A Tribute to the Memory of Shankarrao Kolhe Through a Kirtan

शेवाळे महाराजांचे प्रभावी कीर्तन; लोकसेवा, अध्यात्म आणि शेतकरीहिताच्या कार्याचा उजाळा

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 17 Tue.18.30 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणि समाजकार्याची प्रभावी आठवण करून देत उपस्थितांना अध्यात्म, सद्गुण आणि लोकसेवेचा संदेश देण्यात आला. ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे (मंचर, पुणे) यांच्या ओजस्वी कीर्तनातून कोल्हे यांच्या कार्याचा गौरव करत “ज्याच्याकडे सद्गुण असतात त्याच्यावर जग प्रेम करते,” असा संदेश देण्यात आला.

माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त शंकरराव कोल्हे साहेब विचारधारा ट्रस्टच्या वतीने सोमवारी (दि. १६ मार्च) सायंकाळी आयोजित या कीर्तन सोहळ्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी सिंधूताई (माई) कोल्हे, नितीन कोल्हे, बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, अमित कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, सुमित कोल्हे, ईशान कोल्हे, सौ. रेणुका कोल्हे, श्रद्धा कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी परमपूज्य महंत रमेशगिरीजी महाराज, परमपूज्य परमानंदजी महाराज, महंत सरलादीदी, ह.भ.प. संतोष महाराज जाधव, श्री श्री १०८ परमपूज्य राघवेश्वरानंद गिरीजी महाराज, महामंडलेश्वर काशीकानंदगिरीजी महाराज, अनंतराज महाराज महानुभव, चांगदेव महाराज, विकासगिरीजी महाराज, ह.भ.प. सोमनाथ महाराज मोरे, दामोदरबाबा महाराज, ह.भ.प. जयवंत महाराज खेडकर, ह.भ.प. बाबुराव महाराज चांदगुडे, गोविंद महाराज, ह.भ.प. दादा महाराज टुपके यांसह अनेक संत-महंतांची उपस्थिती लाभली. तसेच राहाता-पिंपळस येथील नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी टाळकरी यांनी कीर्तन सेवेत सहभाग घेतला.

कीर्तनात बोलतांना शेवाळे महाराज म्हणाले की, स्व.शंकरराव कोल्हे यांनी राजकारणाला केवळ सत्तेचा मार्ग मानला नाही, तर लोकसेवेचा धर्म म्हणून स्वीकारले. सहा वेळा आमदार होणे हे केवळ राजकीय यश नव्हे, तर त्यांनी जनतेची मने जिंकली म्हणून मतांचा वर्षाव झाला. “मने जिंकली की मते आपोआप मिळतात,” हा त्यांच्या जीवनाचा खरा मंत्र होता, असे त्यांनी अधोरेखित केले.

कोल्हे यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्याचा उल्लेख करत महाराजांनी सांगितले की, परदेशात उज्ज्वल भविष्याची संधी असतानाही त्यांनी मातृभूमी आणि समाजासाठी कार्य करण्याचा मार्ग निवडला. कोपरगाव परिसरात सहकार, शिक्षण आणि विकासाच्या माध्यमातून साखर कारखाना, शैक्षणिक संस्था उभ्या करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दारे उघडली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी शिक्षण आणि सहकारातून समाजाला बळ दिले.

शेतकरी हा देशाचा कणा असल्याची जाणीव ठेवत त्यांनी शेतकरी प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला. सत्तेचा विचार न करता शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष उभारला. “माझा शेतकरी जगला पाहिजे,” हा त्यांचा ठाम विचार असल्याचेही महाराजांनी सांगितले. रायगड किल्ल्यावर १९८८ मध्ये वीज पडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीचे नुकसान झाले तेव्हा संजीवनी सहकारी साखर कारखान्यातून मदत करून ती पुन्हा उभारण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला.

पंतप्रधान इंदिरा गांधींपासून ते आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ते नावाने परिचित होते.त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत युवा नेते विवेक कोल्हे यांनी थेट सहकार मंत्री व गृहराज्यमंत्री अमितभाई शहा यांना कोपरगावात आणले आणि त्यांच्या मुखातून विवेकभैय्यांचे कौतुकही झाले. स्वर्गीय कोल्हे साहेबांची तीच बौद्धिक क्षमता कोल्हे कुटुंबीय पुढे घेऊन जात आहेत.

संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या अभंगांचा संदर्भ देत शेवाळे महाराजांनी जीवनातील सद्गुण, संयम आणि अध्यात्म यांचे महत्त्व अधोरेखित केले.समाजहित आणि आत्मिक उन्नतीचा मार्ग स्वीकारण्याचा संदेश देत त्यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांनी जपण्याचे आवाहन केले. उपस्थितांनीही या कीर्तनातून प्रेरणा घेत समाजकार्यात सक्रिय राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

You cannot copy content of this page