कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळे यांनी कोपरगावकडे सरकारचे लक्ष वेधले
Against the backdrop of the Kumbh Mela, MLA Ashutosh Kale drew the government’s attention to Kopargaon.
पौराणिक वारसा जपण्यासाठी व भाविकांच्या सुविधांसाठी नासिकप्रमाणे निधी द्यावा; अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 17 Tue.18.40 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :रामायणकालीन परंपरा आणि समृद्ध पौराणिक वारसा लाभलेल्या कोपरगाव शहराला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र निधी मिळावा, अशी जोरदार मागणी आमदार आशुतोष काळे यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडे केली आहे.
नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या काळात देशभरातून लाखो साधू-संत आणि भाविक येत असतात. त्यातील मोठा वर्ग कोपरगावच्या पवित्र भूमीलाही आवर्जून भेट देत असल्याने येथे आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोपरगाव हे दैत्यगुरू शुक्राचार्य यांची कर्मभूमी आणि तपोभूमी म्हणून प्राचीन काळापासून ओळखले जाते. याच भूमीवर शुक्राचार्यांनी घोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून संजीवनी विद्या प्राप्त केली, अशी पौराणिक परंपरा सांगितली जाते. देवगुरू बृहस्पती यांचा पुत्र कच आणि शुक्राचार्य यांच्यातील संजीवनी विद्येचा प्रसंगही याच पवित्र स्थळी घडल्याची मान्यता आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेले हे क्षेत्र प्राचीन दंडकारण्याचा एक महत्त्वाचा भाग मानले जाते.
कोपरगावमधील शुक्राचार्य मंदिराचे वैशिष्ट्य विशेष लक्षवेधी आहे. येथे विवाहासाठी कोणत्याही शुभमुहूर्ताची आवश्यकता नसते, अशी श्रद्धा असल्याने वर्षभर देशाच्या विविध भागांतून भाविक विवाहासाठी येथे येत असतात. त्यामुळे हे मंदिर धार्मिक आणि सामाजिक परंपरेचे अनोखे केंद्र ठरले आहे.
याशिवाय कोपरगाव मतदारसंघातील चासनळी, मोर्वीस, कुंभारी, कोपरगाव बेट, संवत्सर, कोकमठाण आणि पुणतांबा या भागांत अनेक प्राचीन व ऐतिहासिक मंदिरे आहेत. कुंभमेळ्याच्या काळात या ठिकाणी हजारो साधू-संत आणि भाविकांचा ओघ वाढत असतो. या पार्श्वभूमीवर देवस्थानांचा जीर्णोद्धार, मंदिरांचा विस्तार तसेच भाविकांसाठी पाणी, निवास, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने नासिकप्रमाणे कोपरगावलाही कुंभमेळा निधी द्यावा, अशी ठाम मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.
कोपरगावच्या पौराणिक परंपरेला न्याय देत धार्मिक पर्यटनाचा विकास साधण्यासाठी सरकारने या मागणीची दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
चौकट :
पत्रकारितेने उपस्थित केलेला प्रश्न अखेर विधानसभेत
कुंभमेळ्यात कोपरगावचा समावेश करून या शहराला विशेष निधी मिळावा, ही मागणी स्थानिक वृत्तपत्रांमधून वारंवार मांडण्यात आली होती. पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत प्रश्न विचारून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. अखेर या विषयाला आमदार आशुतोष काळे यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज देत शासनाचे लक्ष वेधले. कोपरगावच्या पौराणिक आणि धार्मिक महत्त्वाला न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Post Views:
5





