पोलीस ठाण्यासमोर आंदोलन; उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशुर, नगरसेवक मेहमूद सय्यदसह ९ जणांवर गुन्हा

पोलीस ठाण्यासमोर आंदोलन; उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशुर, नगरसेवक मेहमूद सय्यदसह ९ जणांवर गुन्हा

Protest Outside Police Station; Case Registered Against 9 Individuals, Including Vice-President Jitendra Ranshur and Councilor Mehmood Sayyad

मळेगाव थडी प्रकरणाच्या निषेधार्थ घोषणाबाजी; बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 17 Tue.18.50 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :मळेगाव थडी येथील घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव शहर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करून आक्रमक घोषणाबाजी केल्याप्रकरणी कोपरगाव नगरपालिका भाजपाचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशुर व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मेहमूद सय्यद यांच्यासह नऊ जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल (पोकॉ/२६११) राम गोरक्षनाथ खारतोडे, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक १२१/२०२६ नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १२६ (२) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन केल्याबद्दल कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर जमाव करून गोंधळ घालणे तसेच प्रशासनाने घातलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन करणे या स्वरूपाचे आरोप गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहेत.

आरोपींमध्ये जितेंद्र रणशुर, विजय त्रिभुवण, अनिल रणनवरे, विनोद भोसले (रा. निफाड), प्रकाश दुशींग, इब्राईम उर्फ मुन्नाभाई शेख (रा. मायगाव देवी), मंगेश औताडे (रा. कोळपेवाडी), उत्तम पवार (रा. चांदेकसारे) आणि मेहमूद मन्वर सय्यद (रा. कोपरगाव) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९.४२ वाजण्याच्या सुमारास या सर्वांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळील पायऱ्यांवर जमून आंदोलन केले. यावेळी पोलीस निरीक्षकांच्या कथित पक्षपाती भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान “संदीप कोळी हाय हाय”, “दांडा लेके हल्ला बोल”, “काठी लेके हल्ला बोल” बोल मेरे बहना हल्ला बोल… अशा घोषणा देत हुल्लडबाजी केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. तसेच पोलीस ठाण्यात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचा रस्ता अडविल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक रोकडे करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page