३६०० किमी नर्मदा परिक्रमा पूर्ण; कोपरगावात संतांचे जल्लोषात स्वागत
3,600 km Narmada Parikrama Completed; Saints Accorded Jubilant Welcome in Kopargaon
आत्मा मालिक ध्यानपीठाच्या दिंडीत भक्तांचा जनसागर; परमानंद महाराजांचे मार्गदर्शन, पदाधिकाऱ्यांची उल्लेखनीय उपस्थिती
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 19 Thu.16.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : आत्मा मालिक ध्यानपीठ, कोकमठाण येथील संतांनी तब्बल ३६०० किलोमीटरची पायी नर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण करून कोपरगावात आगमन करताच शहरात भक्तिमय उत्साहाची लाट उसळली. यानिमित्त कोपरगाव शहरवासीय व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने परमपूज्य गुरु माऊलींच्या उपस्थितीत भव्य ‘नर्मदा प्रदक्षिणा स्वागत दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.
आत्मा मालिक ध्यानपीठ ‘प्रत्येकाच्या हृदयात परमात्म्याचे वास्तव्य आहे’ या वैश्विक तत्त्वावर कार्यरत असून ध्यानाच्या माध्यमातून समाजात आत्मचिंतन व संस्कारांची ज्योत प्रज्वलित करत आहे. परमपूज्य आत्मा मालिक माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली हा अध्यात्मिक प्रवास सातत्याने पुढे सुरू आहे.
साईबाबा कॉर्नर येथून प्रारंभ झालेली दिंडी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे स्वामी समर्थ मंदिर होत आश्रमापर्यंत पोहोचली. आत्मस्वरूपाचा रथ, मंगल वाद्यांचा गजर, वाहन दिंडी आणि ‘नर्मदे हर’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या संतांमध्ये संत निजानंद महाराज, संत अशोक महाराज, संत सार्थकानंद महाराज, अथर्वानंद महाराज, सुनील महाराज, विलास भामरे, सुरेश माळोदे, रामेश्वरी माई, ज्ञानेश्वरी माई, स्वरूपा माई, तपस्विनी माई, शोभा शेलार, ललिता भालरे, सुनीता काळे, आशा सोनवणे, प्रज्ञा मिश्रा, सुमन निकम, निर्मला लाटे, छाया मोटे, वंदना इंगळे आदींचा समावेश होता.
संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते संतांचे पूजन व स्वागत करण्यात आले. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यक्रमास आत्मा मालिक ध्यानपीठाचे ज्येष्ठ संत परमानंद महाराज, संत शांतिमाई, स्मृतिमाई, ध्यानीमाई, संत चांगदेव महाराज, विष्णुदास महाराज, प्रेमानंद महाराज, दत्तगिरी महाराज यांच्यासह विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त प्रदीप भंडारी, प्रकाश गिरमे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संत परमानंद महाराज म्हणाले, “युवकांना योग्य दिशा देण्यासाठी अध्यात्मिक उर्जा आवश्यक आहे. विवेक कोल्हे यांचे कार्य समाजात संस्कारांचे बीज पेरणारे आहे. कोल्हे कुटुंबाने या परिसरातील अध्यात्मिक वातावरण वृद्धिंगत करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे,” असे आशीर्वादपर शब्द त्यांनी व्यक्त केले.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने १९ मार्च रोजी माता नर्मदा जलपूजन, कन्या पूजन, नवनाथ पूजन व गुढी पूजनाचे कार्यक्रम पार पडले. दोन्ही दिवस भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत कोपरगावकरांच्या स्मरणात राहील असा ठरला.
Post Views:
6






