उच्च शिक्षणातून ‘विकसित भारत’! — कोपरगावात संशोधन-स्टार्टअप्स ई-परिषद

उच्च शिक्षणातून ‘विकसित भारत’! — कोपरगावात संशोधन-स्टार्टअप्स ई-परिषद

Developed India’ through Higher Education! — Research and Startups E-Conference in Kopargaon

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 27Fir.19.30 Pm.By  सालकर राजेंद्र 

 

कोपरगाव : संशोधन, नवोपक्रम, स्टार्टअप्स आणि बौद्धिक संपदा या चार आधारस्तंभांवर उभा राहणारा ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी उच्च शिक्षणाची निर्णायक भूमिका आहे, हा ठाम संदेश “देण्यात आला

“संशोधन, नवोपक्रम, स्टार्टअप्स आणि बौद्धिक संपदा (IPR) मध्ये उच्च शिक्षणाची भूमिका (RHERISI–2026)”

एकदिवसीय राष्ट्रीय ई-परिषदेतून देण्यात आला. ही परिषद कोपरगावात ऑनलाईन पद्धतीने दिमाखात पार पडली.

रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयातील वाणिज्य, भूगोल, राज्यशास्त्र व बी.बी.ए. विभाग तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशन, हडपसर (पुणे) आणि चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर यांच्या सहकार्याने झालेल्या या परिषदेला देशभरातून प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी स्वागत व प्रास्ताविकातून परिषदेचे उद्दिष्ट स्पष्ट करत “संशोधन आणि नवोपक्रम हेच प्रगतीचे खरे इंजिन आहे,” असे ठामपणे सांगितले. उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

उद्घाटक म्हणून उपस्थित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथील प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाच्या मर्यादा ओलांडून नाविन्यपूर्ण आणि प्रात्यक्षिक शिक्षण स्वीकारावे, असे आवाहन केले. “आत्मनिर्भर भारतासाठी नवोपक्रमशील युवकांची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

अतिथी सत्रात श्रीकांत कुंदेन यांनी उद्योजकतेतील वास्तव मांडत गैरसमज दूर केले, तर आसाम येथील डॉ. गौर गोपाल बनिक यांनी “विकसित भारत @ 2047” या संकल्पनेवर भाष्य करत युवकांच्या सर्जनशीलतेवर विश्वास व्यक्त केला. पुढील सत्रात आशुतोष प्रचंड यांनी बौद्धिक संपदा हक्क आणि नवोपक्रम यांचे महत्त्व स्पष्ट करत संशोधनाला व्यावसायिक दिशा देण्याची गरज अधोरेखित केली. या सत्राचे अध्यक्ष डॉ. राजशेखर निलोलू यांनी संशोधकांना मार्गदर्शन केले.

समारोप सत्रात आदिनाथ दामले यांनी पेटंट संस्कृतीची गरज अधोरेखित करत भारतातील नवोपक्रमाला चालना देण्यासाठी बौद्धिक संपदेचे महत्त्व स्पष्ट केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. संजय कांबळे यांनी संशोधन, कौशल्य आणि उद्योजकता यांचा संगम साधल्याशिवाय उच्च शिक्षणाला खरी दिशा मिळणार नाही, असे स्पष्टपणे नमूद केले.

या परिषदेत एकूण ७५ संशोधन लेख प्राप्त झाले असून ते ‘बुलेटीन ऑफ नेक्सस (USA)’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित होणार आहेत, ही विशेष बाब ठरली.

सूत्रसंचालन प्रा. चैताली वाघ व प्रा. प्रतीक्षा संवत्सरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. पूजा गव्हाळे यांनी केले. विविध विभागांतील प्राध्यापक व समन्वयकांच्या सहकार्यामुळे परिषद यशस्वीरीत्या पार पडली.

उच्च शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रम यांच्या जोरावर ‘विकसित भारत’ घडवण्याचा निर्धार या परिषदेतून ठळकपणे व्यक्त झाला.

Leave a Reply

You cannot copy content of this page