अवकाळीचा कोपरगाववर कहर; शेतकऱ्यांचा आक्रोश टोकाला- तात्काळ मदतीसाठी सर्वपक्षीय एकमुखी मागणी
Unseasonal Rains Wreak Havoc on Kopargaon; Farmers’ Anguish Reaches a Breaking Point—Unanimous, All-Party Demand for Immediate Relief
काळे-कोल्हे-औताडे यांचा प्रशासनाला इशारा; “पंचनामे त्वरित करा, अन्यथा संताप उसळेल”
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 31Tue.17.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : सोमवारी कोपरगाव तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने अक्षरशः थैमान घालत शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचा चुराडा केला. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी एकमुखी आवाज उठवत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी केली आहे.
अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, कांदा, मका, टरबूज, द्राक्षे, आंबा यांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीस आलेली पिके पावसाच्या पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वर्षभराची मेहनत वाहून गेली. अनेक ठिकाणी शेतात साठवून ठेवलेला मालही भिजून गेला असून परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.
आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सुनावले की, “शासनाच्या आदेशांची वाट पाहत बसू नका. तात्काळ पंचनामे सुरू करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवा.” एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी महसूल व कृषी विभागाने युद्धपातळीवर काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही प्रशासनाच्या भूमिकेवर बोट ठेवत तातडीने परिस्थिती वरिष्ठ स्तरावर मांडण्याची मागणी केली. “अवकाळीचा फटका संपूर्ण परिसराला बसला असून शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तात्काळ पंचनामे करून भरीव आर्थिक मदत द्यावी,” असा आग्रह त्यांनी धरला.
शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनीही या संकटाची तीव्रता अधोरेखित करत “शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने विलंब न करता कामाला लागावे,” असे आवाहन केले.
दरम्यान, गारपिटीमुळे चारा पिकांचेही नुकसान झाल्याने जनावरांसमोरील चाऱ्याचा प्रश्न ऐन उन्हाळ्यात गंभीर होण्याची शक्यता आहे. आधीच कमी दरात पिकांची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता दुहेरी संकट कोसळले आहे. या सर्व परिस्थितीत प्रशासनाने तात्काळ हालचाल करून शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, तर संतापाची लाट उसळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा तिन्ही नेत्यांनी दिला आहे.
Post Views:
9