कोपरगावात अपात्रतेचा ‘धडाका’ कायम; आणखी एका नगरसेवकावर टांगती तलवार!

कोपरगावात अपात्रतेचा ‘धडाका’ कायम; आणखी एका नगरसेवकावर टांगती तलवार!

Wave of Disqualifications Continues in Kopargaon; Sword of Damocles Hangs Over Yet Another Councilor!

स्वप्नील मंजुळ प्रकरणी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी; ‘तिसरे अपत्य लपवले’ आरोपाने राजकारण तापले

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 31Tue.18.30 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : नगरपरिषदेतील अपात्रतेच्या कारवाईचा ‘धडाका’ थांबायची चिन्हे नसतानाच आता आणखी एका नगरसेवकावर टांगती तलवार आली आहे. कोल्हे गटाचे विद्यमान नगरसेवक स्वप्नील मंजुळ यांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी उद्या बुधवार (दि.०१) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून, या सुनावणीकडे संपूर्ण कोपरगावकरांचे लक्ष लागले आहे.

उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेविका यांच्या अपात्रतेच्या सुनावणीनंतर राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शिवाजी खांडेकर यांनी स्वप्नील मंजुळ यांच्या निवडीवरच सवाल उपस्थित केला आहे. निवडणूक अर्ज भरताना अपत्यांची चुकीची माहिती देत तिसऱ्या अपत्याची माहिती जाणीवपूर्वक लपवली, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य निवडणूक अधिनियम १९९५ नुसार दोन अपत्यांपेक्षा जास्त अपत्ये असलेली व्यक्ती निवडणूक लढवण्यास किंवा पदावर राहण्यास अपात्र ठरते. याच कायद्याचा आधार घेत खांडेकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे अपील दाखल करत मंजुळ यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सुनावणी निश्चित केली असून, उद्याची सुनावणी कोपरगावच्या राजकारणाला नवी कलाटणी देणारी ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपरिषदेतील सत्तासमीकरणांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page