समता पतसंस्थेवरील शंकांना उत्तर; “गैरव्यवहार नाहीच” – काका कोयटे
Response to Doubts Regarding Samata Credit Society: “Absolutely No Misconduct” – Kaka Koyate
‘शंभर नव्हे ४८ खाती’; ५-६ कोटी व्यवहार, खरातशी संबंध फेटाळला
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 4Sat13.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : समता पतसंस्थेच्या नावावर सुरू असलेल्या कथित गैरव्यवहाराच्या चर्चांना अखेर पूर्णविराम देत संस्थापक अध्यक्ष काका कोयटे यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रोखठोक भूमिका मांडली. “संस्थेचा कारभार पारदर्शक असून कोणताही बेकायदेशीर व्यवहार झालेला नाही,” असा ठाम दावा त्यांनी केला.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना कोयटे म्हणाले की, “या प्रकरणात संस्थेची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्व व्यवहार केले आहेत. पोलिसांनी माहिती मागितल्यानंतर अवघ्या दोन तासांत सर्व कागदपत्रांसह माहिती दिली.”
“शंभर नव्हे, फक्त ४८ खाती”
गैरव्यवहारासाठी शंभराहून अधिक खाती उघडल्याच्या चर्चांना फेटाळून लावत कोयटे म्हणाले, “प्रत्यक्षात केवळ ४८ खात्यांचीच नोंद आहे. काही खातेदारांची सेव्हिंग व बचत अशी दोन खाती असल्याने आकडा मोठा वाटतो.”या खात्यांमधील व्यवहारही “शेकडो कोटींचा नसून फक्त ५ ते ६ कोटींच्या मर्यादेत” असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
व्यवहार २०२१ पासून; कोविड काळात ऑनलाइन भर
अशोक खरात यांच्या नावाशी संबंधित व्यवहार २०२१ पासून सुरू असल्याचे सांगताना कोयटे म्हणाले, “कोरोना काळात ऑनलाइन व्यवहारांना प्राधान्य होते. खातेदारांच्या सोयीसाठीच खाती उघडण्यात आली.”
“अशोक खरातशी कोणताही संबंध नाही”
भोंदू बाबा म्हणून चर्चेत आलेल्या अशोक खरातबाबत बोलतांना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले,“तो आमच्यासाठी एक सामान्य खातेदार होता. त्यावेळी त्याच्यावर कोणताही डाग नव्हता. फोटो काढले गेले असतील, सत्कार झाला असेल, पण ती केवळ ओळखीवर आधारित गोष्ट आहे.” “सर्व व्यवहार कायद्याच्या चौकटीत”
समता पतसंस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत कार्यरत असून सर्व नियमांचे पालन केले असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.“खाते उघडताना KYC प्रक्रिया, आधार लिंकिंग, OTP व्हेरिफिकेशन पूर्ण केले जाते,” असेही त्यांनी नमूद केले.
“नॉमिनी ठरवण्याचा अधिकार ठेवीदाराचा”
खात्यांमध्ये नॉमिनीबाबत अनियमिततेच्या प्रश्नावर कोयटे म्हणाले,“नॉमिनी कोण असावा, हा पूर्ण अधिकार ठेवीदाराचा असतो. संस्थेला त्यात हस्तक्षेप करता येत नाही.”
पोलिस कारवाईनुसार खाती गोठवली
महाव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी माहिती देताना सांगितले की,“पोलिसांच्या सूचनेनुसार संबंधित खाती गोठवण्यात आली आहेत. अंदाजे ३०-३२ लाखांच्या ठेवी त्या खात्यांमध्ये आहेत.”
“४० वर्षांची पारदर्शक परंपरा”
१९८६ मध्ये स्थापन झालेल्या समता पतसंस्थेने गेल्या ४० वर्षांत सातत्याने आर्थिक पत्रके जाहीर केली असून पारदर्शकता जपली आहे.
“आंब्याच्या झाडाला दगड मारले जातात, पण आम्ही त्या दगडांचेही फुलांमध्ये रूपांतर केले,” असा टोला कोयटे यांनी लगावला.
“आरोप म्हणजे प्रगतीवर लक्ष्य” संस्थेच्या वाढत्या प्रगतीमुळेच अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की,“आमच्या कठोर वसुली धोरणामुळे काहींना त्रास होतो, त्यामुळेच चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात.”
शेवटी शायरीतून संदेश पत्रकार परिषद संपताना कोयटे यांनी शेरोशायरीतून आपली भूमिका मांडली –“सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं…”
समता पतसंस्थेवरील आरोपांना काका कोयटे यांनी तथ्यांच्या आधारे जोरदार प्रत्युत्तर दिले. प्राथमिक तपास सुरू असला तरी संस्थेचा कारभार पारदर्शक आणि कायदेशीर असल्याचा ठाम दावा त्यांनी करत “गैरसमज दूर करण्याचा” प्रयत्न केला.
यावेळी पत्रकार परिषदेसाठी अध्यक्ष काका कोयटे, ज्येष्ठ संचालक जितूभाई शहा, महाव्यवस्थापक सचिन भट्टड व वसुली अधिकारी जनार्धन कदम उपस्थित होते.
Post Views:
9