““प्रश्नपत्रिका तुटवडा घोटाळा उघड! कोपरगावात शिक्षण व्यवस्थेचा भोंगळ कारभार”
“Question Paper Shortage Scam Exposed! Shoddy Administration of the Education System in Kopargaon”
संगीता मालकरांचा थेट हल्ला; शेकडो प्रश्नपत्रिका गायब;प्रशासन-ठेकेदार संगनमताचा संशय गडद
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 9Thu19.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव:कोपरगाव तालुक्यातील शाळांमध्ये प्रश्नपत्रिका पुरवठ्याच्या नावाखाली सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा अखेर पर्दाफाश झाला असून, हा केवळ गोंधळ नसून संगनमताने चालवला जाणारा आर्थिक घोटाळा असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या व एस.जी. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता मालकर यांनी थेट पुढे येत २४१ प्रश्नपत्रिका कमी आल्याचा मुद्दा उचलून धरताच प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
मालकर यांनी उघड केलेले वास्तव धक्कादायक आहे. पॅट परीक्षा सुरू झाल्यापासून दरवर्षी हा प्रकार सर्रास सुरू असून, प्रत्येक शाळेत झेरॉक्स केलेल्या प्रश्नपत्रिका दिसणे हे आता नवे राहिलेले नाही. गोपनीयतेच्या नावाखाली खाजगी ठेकेदारांना दिलेले काम प्रत्यक्षात ‘कमिशनखोरी’चे अड्डे बनल्याची चर्चा शिक्षकांमध्ये उघडपणे होत आहे.
एका शाळेची आकडेवारीच या घोटाळ्याचे भीषण चित्र समोर आणते. इयत्ता दुसरीसाठी १४५ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३५ प्रश्नपत्रिका—म्हणजे ११० कमी. तिसरीसाठी १५९ पैकी ९८—६१ कमी. तर चौथीसाठी १७५ पैकी १०५—७० कमी. म्हणजे फक्त गणित या एका विषयासाठी तब्बल २४१ प्रश्नपत्रिकांचा तुटवडा! ही केवळ एका शाळेची एका विषयाची आकडेवारी असून, बाकीच्या विषयांसह संपूर्ण तालुक्यात किती मोठा घोटाळा असेल, याचा अंदाज सहज येतो.
प्रश्नपत्रिकेचा टेंडर दर प्रति पान १.६० रुपये धरला असता साधारण १० पानांच्या प्रश्नपत्रिकेसाठी १६ रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या हिशोबाने २४१ प्रश्नपत्रिकांसाठी ३८५६ रुपयांचा हिशोब बसतो. पण प्रत्यक्षात हीच प्रश्नपत्रिका झेरॉक्सने काढायची तर प्रति प्रती २० रुपये खर्च, म्हणजे ४८२० रुपये! हा अतिरिक्त बोजा कोण उचलणार? शिक्षकांनी का स्वतःच्या खिशाला कात्री लावायची?
प्रश्नपत्रिका कमी, दर वाढलेले, आणि वरून गोपनीयतेच्या नावाखाली दडपशाही, या सगळ्यामुळे शिक्षक अक्षरशः अडकले आहेत. प्रश्नपत्रिका बाहेर काढली तर ‘पेपर फुटला’ म्हणून कारवाई, आणि काढली नाही तर विद्यार्थ्यांचे नुकसान,हा कसला न्याय?
पूर्वी शाळा किंवा स्थानिक प्रशासनच प्रश्नपत्रिका तयार करत होते, तेव्हा असा गोंधळ नव्हता. पण खाजगी टेंडर आल्यानंतरच हा ‘खेळ’ सुरू झाल्याचे शिक्षक ठामपणे सांगतात. प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आणि ठेकेदारांना पाठीशी घालण्याची भूमिका संशय अधिकच गडद करत आहे.
झेडपी आणि पंचायत समितीच्या शिक्षकांनीही हा प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे मान्य केले असून, आता हा मुद्दा उचलून धरण्याची तयारी सुरू आहे. मात्र, आवाज उठवणाऱ्यांवर राजकीय दबाव टाकण्याचे प्रकार सुरू असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रतिक्रिया :
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ शिक्षक हेरंब कुलकर्णी म्हणाले, “प्रश्नपत्रिका पुरवठ्यातील ही अनियमितता अत्यंत गंभीर आहे. हा केवळ निष्काळजीपणा नाही, तर मोठ्या भ्रष्टाचाराचे लक्षण आहे. यामागील साखळी उघड करणे आणि सखोल चौकशी करणे अत्यावश्यक आहे.”
एकूणच, कोपरगावातील हा प्रश्नपत्रिका घोटाळा हा ‘किरकोळ तुटवडा’ नसून शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर उठलेला आर्थिक घाव आहे. आता तरी प्रशासन जागे होणार की ठेकेदारांच्या खिशातच शिक्षण विकले जाणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
Post Views:
5





