आ. काळेंची ५० वर्षांची दूरदृष्टी; ३.३६ एमएलडी वाढीव पाणी आरक्षित,तलाव काँक्रीटीकरण प्रस्तावित
MLA Kale’s 50-Year Vision: 3.36 MLD of Additional Water Reserved; Lake Concretization Proposed.
१३१.२४ कोटींच्या योजनेला गती; ब्रिजलाल नगर जलटाकीची यशस्वी चाचणी-कोपरगावला नियमित पाणीपुरवठ्याची आशा
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 11Sat13.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा वेध घेत पुढील ५० वर्षांचा पाणी प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने आमदार आशुतोष काळे यांनी दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला आहे. कोपरगाव शहरासाठी पूर्वी आरक्षित असलेल्या ५.९६ एमएलडी पाण्यात ३.३६ एमएलडीची भर घालून एकूण पाणी आरक्षण वाढविण्यात आले आहे.
पाणी साठवण क्षमतेत भरीव वाढ करण्यासाठी १ ते ४ क्रमांकाच्या साठवण तलावांचे केवळ गाळ काढणे किंवा खोलीकरण न करता, ५ नंबर तलावाच्या धर्तीवर सर्व तलावांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या कामांसाठी आवश्यक निधी मिळविण्यासाठी आमदार काळे स्वतः पाठपुरावा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे माजी गटनेते विरेन बोरावके यांनी दिली.
दरम्यान, शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी १३१.२४ कोटी रुपयांच्या योजनेला गती मिळाली आहे. या योजनेअंतर्गत ५ नंबर साठवण तलावाची उभारणी, ९५ किलोमीटर लांबीची नवीन पाईपलाईन, तसेच संजयनगर, ब्रिजलाल नगर, गोरोबा नगर, मोहनीराज नगर आणि साईबाबा कॉर्नर येथे नवीन जलटाक्या उभारण्यात आल्या आहेत. लक्ष्मीनगर येथील जुन्या टाकीची दुरुस्तीही करण्यात आली आहे.
या प्रकल्पामुळे पूर्वी १६ ते २१ दिवसांनी मिळणारे पाणी आता चार दिवसाआड मिळू लागले असून, नियमित पाणीपुरवठ्याच्या दिशेने शहराने मोठी झेप घेतली आहे. विशेष म्हणजे ब्रिजलाल नगर येथील जलटाकीची चाचणी नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, या टाकीतून ब्रिजलाल नगरसह माधव नगर, शंकर नगर, गवारे नगर, ओम नगर, श्रद्धा कॉलनी, सह्याद्री कॉलनी आणि द्वारका नगरी या भागांना पाणीपुरवठा होणार आहे.
वितरण व्यवस्थेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच कोपरगावकरांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहराच्या दीर्घकालीन पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दिशेने हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास विरेन बोरावके यांनी व्यक्त केला आहे.
Post Views:
2





