कोपरगाव : शहराच्या पाणीप्रश्नावर गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांचा अक्षरशः पाऊस पडला. ४९ कोटींच्या योजनेने सुरुवात झाली, त्यानंतर १३१ कोटींचा भला मोठा आकडा जोडला गेला. एकूण १८० कोटींच्या घरात पोहोचलेली ही योजना कागदोपत्री भव्य, उद्घाटनांनी गाजलेली आणि आश्वासनांनी झगमगलेली दिसते. पण वास्तव मात्र इतके कडू आहे की, आजही कोपरगावकरांच्या नशिबी अनियमित, दूषित आणि अपुरे पाणीच येते. विकासाच्या नावाखाली झालेला हा खर्च खरोखर पाण्यासाठी झाला की केवळ आकड्यांच्या खेळासाठी? हा प्रश्न आता टोकदारपणे समोर येत आहे. आवर्तन ६० दिवसांवर; ही सेवा की शिक्षा?
शहराला पाणीपुरवठ्याचे आवर्तन तब्बल ६० दिवसांवर गेले आहे. म्हणजे दोन महिने साठवण तलावाचे पाणी पुरवायचे आणि नंतर एकदाच पाणी! ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या अपयशाची नाही, तर नागरिकांवरील अन्यायाची परिसीमा आहे. इतक्या मोठ्या कालावधीत मिळणारे पाणीही स्वच्छ असेलच याची शाश्वती नाही. गढूळ, दुर्गंधीयुक्त आणि आरोग्यास घातक असे पाणी नागरिकांना वापरावे लागत आहे. पाणी ही मूलभूत गरज असताना तीच गरज आज संघर्षाचा विषय बनली आहे. पाटाच्या दूषित पाण्याचा धोका; आरोग्य धोक्यात
नाशिककडून येणाऱ्या पाण्यात सांडपाण्याचे मिश्रण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. कालवे गाळाने भरलेले, ठिकठिकाणी गळती, आणि देखभालीचा पूर्ण अभाव, या सर्व गोष्टी मिळून पाण्याची गुणवत्ता धोकादायक बनवत आहेत. प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना केल्याचे चित्र कुठेच दिसत नाही. उलट, या गंभीर प्रश्नावर मौन पाळले जात असल्याने संशय अधिकच गडद होत आहे. निळवंडेचे स्वप्नही राजकारणात विरले…
निळवंडे धरणातून पाणी येणार, “साईकृपेने प्रश्न सुटणार” अशा मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. पण प्रत्यक्षात या योजनेलाही श्रेयवादाचे ग्रहण लागले. कोणामुळे पाणी आले, कोणाचे श्रेय? या वादातच संपूर्ण योजना अडकून पडली आणि विरून गेली नागरिकांच्या नळात पाणी कधी येणार, याचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही. १५१ किमी पाईपलाईनचा दावा; वास्तव मात्र शून्य
४९ कोटी रुपयांत ५६ किलोमीटर आणि १३१ कोटी रुपयांत ९५ किलोमीटर — असे एकूण १५१ किलोमीटर पाईपलाईन टाकल्याचा दावा करण्यात आला. पण जर इतकी भव्य पायाभूत सुविधा उभारली असेल, तर शहरात पाणीपुरवठा सुरळीत का नाही? हा मूलभूत प्रश्न प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना अस्वस्थ करणारा ठरत आहे. चाचणीशिवाय देयके; जबाबदार कोण?
पहिल्या टप्प्यातील कामांवर सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित झाले होते. कामाची गुणवत्ता तपासल्याशिवाय पैसे देऊ नयेत, असा इशारा दिला गेला होता. तरीही अंतिम चाचणी न करता कंत्राटदाराला संपूर्ण देयक अदा करण्यात आल्याची बाब समोर आली. म्हणजेच, तपासणीशिवाय कामे मंजूर झाली आणि त्याचे परिणाम आज नागरिक भोगत आहेत. नगराध्यक्ष पराग संधान यांनी केलेल्या टीकेनंतर
कळीचा मुद्दा ठरला पाच नंबर साठवंण तलाव
‘पाच नंबर तलाव’ — उपयोग की केवळ दिखावा?
शहरासाठी उभारण्यात आलेला पाच नंबर साठवण तलाव हा केवळ गवगवा असल्याचे वक्तव्य समोर आल्यानंतर या संपूर्ण योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर हा प्रकल्पच उपयोगाचा नसेल, तर त्यावर खर्च झालेला निधी कोणत्या निकषांवर मंजूर करण्यात आला? आणि त्याचा फायदा कोणाला झाला?
कळीचा मुद्दा ठरलेली हीच ती पाण्याची टाकी
जमिनीखाली पाईप की पैसा?
इतक्या मोठ्या प्रमाणावर पाईपलाईन टाकल्याचे सांगितले जाते, पण त्याचे ठोस पुरावे कुठे आहेत? अधिकृत DPR आणि प्रत्यक्ष काम जुळते का? GPS मॅपिंग सार्वजनिक का नाही? तृतीयपक्ष मोजमाप झाले का? हायड्रो आणि प्रेशर टेस्टिंगचे अहवाल कुठे आहेत? वापरलेल्या पाईपची गुणवत्ता काय? — या सर्व प्रश्नांची उत्तरे आजही अंधारात आहेत. त्यामुळेच नागरिक आता थेट विचारू लागले आहेत . “जमिनीखाली नेमकं गाडलं काय, पाईप की पैसा?”
प्रशासन-कंत्राटदार साखळीवर संशय
संपूर्ण प्रकरणात प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदार यांच्यातील साखळीवर संशय व्यक्त केला जात आहे. कोट्यवधींचा निधी खर्च होतो, पण समस्या सुटत नाही — ही बाब योगायोग म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. पारदर्शकतेचा पूर्ण अभाव आणि उत्तरदायित्वाची कमतरता यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. जनतेचा संताप उफाळला; आता हिशोब हवा!
कोपरगावकर आता केवळ आश्वासनांवर समाधानी नाहीत. त्यांना १८० कोटी रुपयांचा स्पष्ट हिशोब हवा आहे. १५१ किलोमीटर पाईपलाईनचा दावा आणि प्रत्यक्षात मिळणारे पाणी — यातील तफावत समजून घेण्यासाठी स्वतंत्र चौकशीची मागणी जोर धरत आहे.
थेट मागण्या; आता कृती हवी संपूर्ण पाणी योजनेचा ‘व्हाइट पेपर’ जाहीर करावा,तृतीयपक्ष तांत्रिक ऑडिट तातडीने करावे,GPS आधारित पाईपलाईन मॅपिंग सार्वजनिक करावे, दोषींवर फौजदारी कारवाई करावी शेवटचा सवाल… पाणी ही चैनीची गोष्ट नाही, ती जीवनाची गरज आहे. कोपरगावकरांना तहानलेले ठेवून विकासाच्या घोषणा करणे म्हणजे क्रूर विनोदच ठरेल. आता प्रशासन जागे होणार का? की हा पाणीप्रश्न कायम राजकारणातच बुडत राहणार?
कोपरगावच्या जमिनीखाली दडलेले सत्य उघड करण्याची वेळ आली आहे — कारण जनता आता शांत बसणार नाही! चौकट | ‘तिथेच परत’ पंधरा दिवसांवरून पाच दिवसांवर— कोपरगाव पाणीप्रश्नाचा कडू हिशोब मागे काय होतं… आणि आज काय आहे?
८–१० वर्षांपूर्वी १५–२० दिवसांनी पाणी — शहराची दयनीय अवस्था, मोठ्या निधीच्या आश्वासनांनंतर “स्थिती बदलणार” अशी अपेक्षा, आज वास्तव — ५ दिवसांनी पाणी, तेही गाळमिश्रित, निकृष्ट आणि अस्वच्छ कोट्यवधींचा वर्षाव… पण बदल शून्य!
गेल्या ७–८ वर्षांत जवळपास १८० कोटी रुपयांचा निधी, “दररोज/दिवसाआड पाणी” देण्याच्या घोषणा,उद्घाटने, गाजावाजा… पण प्रत्यक्षात स्थिती पुन्हा तिथेच पाणीपुरवठा की व्यवस्थेचा कोलमडलेला कणा?
अनियमित पुरवठा, कमी दाब दूषित पाणी — आरोग्याला धोका,नागरिकांचा त्रास कायम; सुविधा नाही, फक्त संघर्ष गळती थांबत नाही… खर्च मात्र सुरूच!
दरमहा ३ ते ३.५ लाख रुपये गळती दुरुस्तीसाठी खर्च, तरीही गळती कायम — काम होते की फक्त कागदावर? थेट सवाल — मिळवलं तरी काय? १८० कोटी खर्चूनही परिस्थिती पूर्वीसारखीच का? पाईपलाईन, प्रकल्प, तलाव — यांचा उपयोग नेमका कुठे? नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणी कधी?
🔴 जनतेची ठाम मागणी
संपूर्ण योजनेचा पारदर्शक हिशोब जाहीर करा
कामांची तांत्रिक चौकशी व ऑडिट करा
गळती खर्चाची सखोल तपासणी करा
दोषींवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करा आठ दहा वर्षांचा स्वप्नांचा काळ (चकवा लागला)
कोपरगावचा पाणीप्रश्न सुटला नाही, उलट ‘जिथून सुरुवात झाली, तिथेच शहर पुन्हा उभं आहे’. एक मात्र या आठ दहा वर्षात निळवंडे चे स्वच्छ पाणी येणार पाच नंबर साठवण तलाव झाला दिवसाआड नियमित स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणार अशा वेगवेगळ्या स्वप्नांत रमण्यात कोपरगावकरांची ८-१० वर्ष निघून गेली परंतु पाण्याच्या विषयावरून सुरू झालेल्या राजकीय आरोप प्रत्यारोप श्रेयवाद यामुळे आठ दहा वर्षाचे एक सुंदर स्वप्न भंगले ! आठ दहा वर्षांपूर्वी पाणी प्रवासाची वाटचाल जेथून सुरू झाली होती आजही आपण पुन्हा त्याच ठिकाणी आहोत फिरून फिरून त्याच ठिकाणी येणे याला पूर्वी चकवा लागल्या असे म्हणायचे अगदी तीच गत झाल्याचा कोपरगावकरांना साक्षात्कार झाला. फरक एवढाच झाला की पंधरा दिवसा वरून पाच दिवसावर आलो बाकी सर्व ऑलवेल ? आता आम्हाला आश्वासन नको, ठोस उत्तर आणि स्वच्छ पाणी हवे!