सभेतून पळ काढणाऱ्यांचा विकास विरोधी चेहरा उघडा! जितेंद्र रणशूर
Expose the Anti-Development Face of Those Who Fled the Meeting! — Jitendra Ranshur
काळे गटावर हल्लाबोल; “अनुपस्थिती म्हणजे शहराच्या प्रगतीला अडथळा”
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 22 aWed 19.00 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेला जाणीवपूर्वक अनुपस्थित राहून काळे गटाच्या नगरसेवकांनी शहराच्या विकासात्मक निर्णयांना अप्रत्यक्ष विरोध दर्शविल्याचा घणाघाती आरोप उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी केला. “जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होणार असताना सभागृह टाळणे म्हणजे विकासापासून पळ काढणेच,” असा रोखठोक इशाराही त्यांनी दिला.
रणशूर म्हणाले की, एका कार्यकर्त्याच्या वैयक्तिक वादाचा मुद्दा पुढे करून संपूर्ण शहराच्या विकासाला अडथळा निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. स्वामी समर्थ केंद्र प्रमुखासोबत झालेल्या वादप्रकरणात उलट आरोप करत ‘उलटा चोर कोतवाल को दाटे’ हीच भूमिका काळे गटाने घेतली असून त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे.
“शहराची शांतता भंग करण्याचे काम कोण करत आहे, हे नागरिकांना चांगलेच ठाऊक आहे. कायदेशीर कारवाई कोणावर झाली, हेही सर्वांना माहीत आहे. त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन खोटे आरोप करणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करावे,” असा टोला त्यांनी लगावला.
गेल्या चार वर्षांत अनेक कामांमध्ये अनियमितता व मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोपही रणशूर यांनी केला. “या सर्व व्यवहारांची श्वेतपत्रिका काढण्याचा विषय आम्ही मांडणार असल्याची चाहूल लागताच विरोधी नगरसेवकांनी भीतीपोटी सभेला दांडी मारली. कुणाच्या आदेशावरून ते अनुपस्थित राहिले, हे सांगण्याची गरज नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर पारदर्शक कारभार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे सांगत रणशूर यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
चौकट :
“ठेकेदाराने आणलेल्या नारळावरही स्वतःचे नाव कोरण्याचा बालिश प्रयत्न करणाऱ्यांना जनतेने राजकीय नारळ दिला आहे. त्यामुळे त्यांची अवस्था आज हास्यस्पद झाली आहे,” अशी बोचरी टीका करत रणशूर यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.
Post Views:
15





