कोपरगाव विकासाला गती; २९ निर्णयांतून शहराला नवी दिशा!- ”पराग संधान 

कोपरगाव विकासाला गती; २९ निर्णयांतून शहराला नवी दिशा!- ”पराग संधान 

Momentum for Kopargaon’s Development: 29 Decisions Chart a New Course for the City! — Parag Sandhan

नगराध्यक्षांचा  ठाम दावा – ‘जनहिताचे निर्णय, अंमलबजावणीत ढिलाई चालणार नाही’

कोपरगाव : शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत तब्बल २९ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, या निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिले. “विकासाचा विश्वास केवळ घोषणांपुरता नाही, तर प्रत्यक्ष कामातून नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे,” असा ठाम इशाराच त्यांनी प्रशासनाला दिला.

नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत पाणीपुरवठा, स्वच्छता, विद्युत, नगररचना, बांधकाम आदी विभागांतील प्रलंबित प्रश्नांवर थेट चर्चा करत निर्णयांचा सपाटा लावण्यात आला. जलकुंभांच्या सुरक्षेसाठी फेन्सिंग, तलावांवर सीसीटीव्ही बसविणे, येसगाव तलावातील यंत्रसामग्री दुरुस्ती तसेच साठवण तलावांचे ठेके देण्यास मंजुरी देण्यात आली.

दोन वर्षांपासून रखडलेल्या पाच नंबर तळ्याच्या कामावर प्रशासनाला धारेवर धरत संबंधित ठेकेदारास तातडीचे आदेश देण्यात आले. शहरातील अडथळा ठरणाऱ्या वृक्षफांद्या छाटण्याचा निर्णय घेत वाहतूक आणि वीजपुरवठा सुरळीत करण्यावर भर देण्यात आला. तसेच फ्लेक्ससाठी निश्चित जागा ठरवून अनियंत्रित फलकबाजीला लगाम घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

पर्यावरण आणि आरोग्याचा मुद्दा अग्रक्रमावर ठेवत प्लास्टिक प्लेट, कॅरीबॅग आणि सिल्वर फॉइलवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शहरातील रुग्णालयांच्या बायोमेडिकल कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी इनसिनरेशन प्लांट उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून त्यासाठी आरक्षित जागा वाढविण्याचाही निर्णय घेण्यात आला.

नगरपरिषदेच्या मालकीच्या गाळ्यांच्या प्रलंबित प्रकरणांना गती देणे, शॉपिंग सेंटरचे स्ट्रक्चरल ऑडिट, स्वच्छता विभागासाठी नवीन यंत्रसामग्री खरेदी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांना करसवलत यांसारखे निर्णयही सभेत घेण्यात आले.

“युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपरिषद विकासाच्या दिशेने ठोस पावले टाकत आहे. आता निर्णय नव्हे, तर परिणाम दिसले पाहिजेत,” असे ठाम मत नगराध्यक्ष पराग संधान यांनी व्यक्त केले.

दरम्यान, रखडलेल्या कामांबाबत ठेकेदारांवर कारवाईचा इशारा देत अण्णाभाऊ साठे नाट्यगृह सुरू करण्यासाठी सकारात्मक हालचाली सुरू करण्याचेही संकेत देण्यात आले. शहरात सायलेंस झोन निश्चित करण्यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधण्याचा निर्णयही घेण्यात आला.

एकूणच, कोपरगाव नगरपालिकेच्या या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे विकासाचा वेग वाढणार की केवळ कागदोपत्री राहणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page