“६७ कोटी वळवून विकासाचा गळा घोटला! बहिष्काराचे नाट्य करून पाप झाकण्याचा डाव- सत्ताधाऱ्यांचा थेट पलटवार!”

६७ कोटी वळवून विकासाचा गळा घोटला! बहिष्काराचे नाट्य करून पाप झाकण्याचा डाव- सत्ताधाऱ्यांचा थेट पलटवार!”

Development Strangled by Diverting ₹67 Crores! A Ploy to Cover Up Misdeeds Through a Staged Boycott—The Ruling Party Launches a Direct Counterattack!”

“दोन कोटींचा भुर्दंड जनतेवर का?” — विरोधकांना थेट सवाल; “निधी वळवला, आता जबाब द्या!” — कोपरगावात आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पेटली

कोपरगाव : शहराच्या विकासासाठी आलेल्या तब्बल ६७ कोटी रुपयांच्या निधीवरून कोपरगावची राजकीय हवा तापली असून, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार करत “बहिष्काराचे नाट्य करून स्वतःची पापे झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे” असा थेट आरोप केला आहे.

माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत स्फोटक आरोप करत, वित्त निधीतून ५७ कोटी आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून १० कोटी असा एकूण ६७ कोटींचा निधी सत्तांतरानंतर मुद्दाम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वळवण्यात आल्याचा गंभीर दावा केला. “या प्रक्रियेत दोन कोटींचा अतिरिक्त भुर्दंड जनतेच्या माथी मारला गेला, त्याची भरपाई कोण करणार?” असा जाब त्यांनी थेट प्रशासनाला विचारला आहे.

सोनवणे यांनी विरोधकांवर निशाणा साधत, “सभेत हजर राहिल्यास निधी वळवण्याचा बूमरँग उलटणार या भीतीनेच बहिष्काराचे नाट्य रचले गेले,” असा गौप्यस्फोट केला. “हल्ला झाल्याचा दावा पूर्णपणे खोटा असून केवळ बाचाबाची झाली,” असे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दरम्यान, सत्ताधारी गटानेही जोरदार प्रतिहल्ला चढवला. गटनेते प्रसाद आढाव यांनी “नगरपालिकेकडे सक्षम यंत्रणा असताना केवळ राजकीय आकसापोटी निधी वळवण्यात आला. आम्ही विकासकामांना अडथळा आणणार नाही; मात्र दोन कोटींचा भुर्दंड जनतेवर का टाकला, याचे उत्तर मिळालेच पाहिजे,” अशी रोखठोक भूमिका मांडली.

माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी निळवंडे पाणी योजनेचा मुद्दा उचलत, “शहराला कायमस्वरूपी पाणी मिळण्याच्या उंबरठ्यावर असलेली निळवंडे योजना श्रेयाच्या राजकारणातून कोर्टात अडकवली गेली. आता पाच नंबर तलावाचे अर्धवट काम करून कोट्यवधींचा खेळ झाला,” असा आरोप करत सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले.

संदीप देवकर यांनीही “तांत्रिक चाचणी न करता ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले. ९२ किमी पाइपलाइनचा हिशेब कुठे आहे?” असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

विनोद राक्षे यांनी विरोधकांवर टीका करत, “निवडणूक हरल्याच्या नैराश्यातून निधी वळवला गेला. बहिष्कार म्हणजे जनतेशी विश्वासघातच,” असे म्हणत विरोधकांची खिल्ली उडवली.

दरम्यान, नगरसेवक अनिल आव्हाड म्हणाले की,“निळवंडेचे पाणीच कोपरगावचा कायमस्वरूपी उपाय आहे,” असा ठाम दावा करत सत्ताधाऱ्यांनी पुढील पाच वर्षांत पाणीप्रश्न सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला.एकूणच, ६७ कोटींच्या निधीभोवती फिरणारे आरोप-प्रत्यारोप, बहिष्काराचे राजकारण आणि पाणीप्रश्नावरून पेटलेली ही संघर्षरेषा आगामी काळात आणखी तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. कोपरगावकर मात्र यामध्ये विकास कुठे हरवतोय, याचे उत्तर शोधत आहेत.

चौकट

पत्रकारांसाठी सन्मानाची हमी!

नवीन पालिका इमारतीत लवकरच सर्वसाधारण सभांना पत्रकारांना सन्मानाने प्राचारण करण्यात येणार “पारदर्शक आणि जनताभिमुख कारभारासाठी माध्यमांची उपस्थिती आवश्यक” — सत्ताधाऱ्यांची ग्वाही,कोपरगाव पालिकेचे नवीन सभागृह सज्ज होत असून, स्थलांतरानंतर पत्रकारांना सर्वसाधारण सभेसाठी अधिकृतपणे व सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात येईल, अशी स्पष्ट हमी सत्ताधाऱ्यांनी दिली.
 “जुन्या सभागृहात जागेअभावी मर्यादा होत्या; मात्र नवीन इमारतीत माध्यमांना योग्य स्थान दिले जाईल,” असे सांगत पारदर्शक कारभाराचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेते प्रसाद आढाव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, योगेश बागुल, विजय आढाव, विनोद राक्षे, संदीप देवकर, संतोष गंगवाल, विजय वाजे, उमेश धुमाळ नगरसेवक वैभव आढाव, प्रशांत कडू विक्रमादित्य सातभाई, अतुल काले, अनिल आव्हाड, रवी कथले, वैशाली वाजे, सुरेखा राक्षे, निलोफर पठाण सविता मंजुळ, सोनल अजमेरे, विजया देवकर, आदि सह नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

You cannot copy content of this page