श्रेयवादाच्या रणधुमाळीत विकासाचा बळी; कोपरगावला ‘काम’ हवं, ‘कोणी केलं’ नव्हे!
Development Falls Victim to the Battle for Credit; Kopargaon Needs ‘Work’—Not Arguments Over ‘Who Did It’!
काळे-कोल्हे गट एकाच सत्तेत; मगही श्रेयाची कुरघोडी का? जनतेचा सवाल – निकोप स्पर्धा करा, पण कामे दर्जेदार करा!
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 25Sat 16.10 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव शहर व तालुक्याच्या विकासाच्या नावावर गेली दोन दशकं राजकीय नेत्यांनी ‘पाठपुरावा’ आणि ‘मागण्या’ यांचा मोठा गाजावाजा केला. माजी आमदार अशोक काळे यांनी २००४ ते २०१४ त्यांच्या कार्यकाळात अनेक कामांसाठी निधीची मागणी केली, त्यानंतर २०१४ ते २०१९ दरम्यान माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शेकडो कामांचे प्रस्ताव मांडत पाठपुरावा केला. २०१९ नंतर विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनीही शंभर कामांची यादी पुढे करत निधीसाठी धावपळ सुरू ठेवली.
म्हणजेच, प्रत्येकाने आपापल्या काळात ‘कामं आणली’ असा दावा केला. काही कामे मंजूर झाली, काही पूर्ण झाली, काही सुरू आहेत तर काही अजूनही कागदोपत्रीच आहेत. पण या सर्व प्रक्रियेत एक वस्तुस्थिती कायम राहिलीप्रशासकीय कामकाजाचा वेग आणि अंमलबजावणीतील विलंब!
प्रस्ताव मांडणे, मंजुरी मिळवणे, त्रुटी दूर करणे आणि प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत अनेक वर्षे उलटतात. इतकेच नव्हे, ज्या नेत्यांनी एखाद्या कामासाठी जीव तोडून पाठपुरावा केला, त्यांच्या कार्यकाळानंतरच त्या कामाची सुरुवात होते. मग श्रेय कोणाचे? हा प्रश्नच निरर्थक ठरतो.
आज परिस्थिती वेगळी आहे. नगरपालिकेत कोल्हे गटाची सत्ता आहे, राज्यात महायुतीचे सरकार आहे आणि काळे-कोल्हे दोन्ही गट सत्तेच्या परिघातच आहेत. अशा वेळी ‘तू केलं की मी केलं’ या वादाला काहीही अर्थ उरत नाही. उलट, हीच वेळ आहे निकोप स्पर्धेची—कोण जास्त निधी आणतो, कोण जास्त दर्जेदार काम करतो, हे जनतेसमोर कागदोपत्रीसह मांडण्याची!
परंतु दुर्दैवाने, सध्याच्या राजकारणात श्रेयवादाची धूळ इतकी उडवली जाते की, मूळ मुद्दा—कामाची गुणवत्ता—दुर्लक्षित राहतो. परिणामी, निकृष्ट दर्जाची कामे होतात, रस्ते काही महिन्यांत उखडतात, पाणी योजना अर्धवट राहतात आणि त्याचा फटका थेट जनतेला बसतो. या गोंधळात मात्र अधिकारी आणि ठेकेदारांचे चांगलेच ‘फावते’, ही कटू वस्तुस्थिती आहे.
कोपरगावच्या विकासाचा अनुशेष अजूनही मोठा आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न आजही जैसे थे आहेत. त्यामुळे आता राजकीय नेत्यांनी श्रेयाच्या भांडणात वेळ वाया घालवण्याऐवजी, एकत्रितपणे शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी काम करण्याची गरज आहे.
जनतेची भूमिका स्पष्ट आहे.“कोणामुळे काम झाले यापेक्षा, काम झाले का आणि ते टिकाऊ आहे का?”
शेवटी, श्रेय कोणाला द्यायचे हे जनता ठरवते. ती सुज्ञ आहे. त्यामुळे नेत्यांनी श्रेयवादाच्या राजकारणातून बाहेर पडून, विकासाच्या स्पर्धेत उतरावे—हीच कोपरगावकरांची ठाम मागणी आहे.
चौकट :
काम कोणतेही असो—भूमिपूजन, उद्घाटन की लोकार्पण! गावात काम सुरू झालं की श्रेयासाठी दोन्ही गट आमनेसामने. “आम्ही केलं” विरुद्ध “आमच्यामुळे झालं” असा दावा-प्रतिदावा रंगतो. आरोप-प्रत्यारोपांची फैर, टीकेची धार आणि राजकीय कुरघोड्यांचा खेळ जोरात रंगतो. विकासापेक्षा श्रेय महत्त्वाचं ठरतं, हेच वास्तव. शेवटी जनतेच्या वाट्याला काय?—करमणूक!
Post Views:
3





