गोदा-नर्मदा जलयात्रेत ११७ नद्यांचा संगम; दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प – राधाकृष्ण विखे पाटील
Confluence of 117 Rivers in the Goda-Narmada Water Journey; A Pledge for a Drought-Free Maharashtra – Radhakrishna Vikhe Patil
त्र्यंबकेश्वर ते शिर्डी जलसंग्रहाचा ऐतिहासिक प्रवास • नर्मदेत पवित्र जल विसर्जनाचा निर्धार • जलप्रकल्पांना गती देण्याचे संकेत
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 27Mon 14.10 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :त्र्यंबकेश्वर येथून पवित्र गोदावरी जल घेऊन सुरू झालेल्या ‘गोदा-नर्मदा जलयात्रे’ने राज्यभर जलसंवर्धनाचा नवा संदेश दिला असून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार अधिक बळकट झाल्याचे प्रतिपादन जलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना व मार्गदर्शनातून ही यात्रा साकारली असून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित या यात्रेला चोंडी येथील पवित्र माती व गोदावरी जल घेऊन प्रारंभ करण्यात आला. विविध मार्गांनी निघालेल्या यात्रांचा संगम शिर्डी येथे झाला.
गडचिरोलीपासून सिंधुदुर्गपर्यंत तब्बल ११७ नद्यांचे पाणी एकत्र करून कलश पूजन करण्यात आले असून हे पवित्र जल नर्मदा नदी मध्ये विसर्जित करण्यात येणार आहे. या उपक्रमातून राज्यभर जलसंवर्धनाबाबत जनजागृती होत असून विविध मंत्री, आमदार, खासदार तसेच शेतकरी संघटनांचे नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांना गती देण्याचा निर्धार व्यक्त करत निळवंडे धरणासह अनेक योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे विखे यांनी स्पष्ट केले. पश्चिमेकडील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून सुमारे ७८ टीएमसी पाणी उपलब्ध करण्याच्या योजनेलाही वेग दिला जात आहे.
जायकवाडी, उजनी व गंगापूर धरणांमधील गाळ काढण्याचे काम हाती घेऊन जलसाठा वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. “एक टीएमसी पाणी वाढवण्यासाठी हजारो कोटींचा खर्च येतो, त्यामुळे जलसंधारण हाच पर्याय,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, शेतकरी नेते सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, खासदार रामराव वरकुटे, नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रथयात्रेचे स्वागत व पूजन करून मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर बिपीन कोल्हे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जलव्यवस्थापन कार्याचा गौरव करत “त्यांना पाणी व्यवस्थापनाच्या स्थापनेच्या जनक म्हटले तरी वावगे ठरणार नाही,” असे ठामपणे सांगितले. घाट, पाणवठे व विहिरींच्या माध्यमातून त्यांनी सर्व समाजघटकांपर्यंत पाणी पोहोचवले, ही दूरदृष्टी आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना व राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून सुरू झालेली ही जलयात्रा दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी महत्त्वाची पायरी असल्याचे सांगत त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री व गिरीश महाजन यांचेही आभार मानले. शेवटी विखेंना उद्देशून “आम्ही त्यांना नेते मानतो, पण ते आम्हाला तसे मानत नाहीत,” असा हलकाफुलका चिमटा काढत त्यांनी वातावरण हलके केले.
यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी “ही केवळ जलयात्रा नसून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार आहे,” असे ठासून सांगितले. अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षात निघालेली ही यात्रा म्हणजे कळस असल्याचे नमूद करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर जलव्यवस्थापनाचा वारसा अहिल्यादेवींनी प्रभावीपणे पुढे नेल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी पाण्याचा प्रश्न केवळ राजकीय हत्यार म्हणून वापरला, असा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हजारो कोटींच्या योजना प्रत्यक्षात राबवल्या जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
चौकट : टोलेबाजीने रंगली सभा, हास्यकल्लोळ उसळला
कार्यक्रमादरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी “मी नेता नाही, सहकारी आहे,” मधल्या मध्ये कधीतरी कार्यकर्ते गडबड करतात असे म्हणत कार्यकर्त्यांतील गैरसमजांवर भाष्य केले. याचवेळी त्यांनी संजीवनीचे व्हाईस चेअरमन कोण, असा सवाल बिपीन कोल्हे यांना केला. त्यावर कोल्हे यांनी “आपलेच परजणे आहेत,” असे उत्तर दिले. यावर शब्दांचा रोख थेट राजेश परजणे यांच्याकडे वळवत विखे पाटील म्हणाले, “सर्व परजणेंना आपलेच समजा.” पण लगेचच कोल्हे यांनी मिश्कील शैलीत “आम्ही सर्वांना आपलेच मानतो, पण ते आम्हाला आपले मानत नाहीत,” असा रोखठोक पलटवार करताच विखे म्हणाले त्यांना मी समजावतो यांवर सभागृहात एकच हास्यकल्लोळ उसळला.
Post Views:
10







