अहिल्यादेवींचा जलवारसा ; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी ठोस पावले- राधाकृष्ण विखे पाटील
Ahilyadevi’s Water Legacy: Concrete Steps Towards a Drought-Free Maharashtra — Radhakrishna Vikhe Patil
गोदा ते नर्मदा’ यात्रेने कोपरगाव दणाणले ढोल-ताशांत जल्लोषात स्वागत
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 27Mon 19.10 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :“महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी शासन कटिबद्ध असून ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा ही जलक्रांतीची निर्णायक सुरुवात आहे,” असा ठाम व रोखठोक संदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोपरगावात दिला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित जलयात्रेचे सोमवारी शहरात जल्लोषात आगमन होताच संपूर्ण कोपरगाव ‘जलक्रांती’च्या घोषणांनी दुमदुमून गेले.
श्री साईबाबा तपोभूमी येथे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जलकलशाचे विधिवत पूजन करण्यात आले. शिर्डीकडून येणाऱ्या यात्रेचे ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि रांगोळ्यांनी सजलेल्या रस्त्यांतून भव्य स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही जलयात्रा राबविण्यात येत असून जलसंधारणाचा व्यापक संदेश राज्यभर पोहोचवला जात आहे.
यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले, “अहिल्यादेवींनी दिलेला जलव्यवस्थापनाचा आदर्श आजही मार्गदर्शक आहे. ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा ही केवळ यात्रा नसून लोकसहभागातून उभी राहणारी जलसंधारणाची चळवळ आहे.” पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
आमदार गोपीचंद पडळकर यांनीही “ही जलयात्रा म्हणजे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्पच आहे,” असे ठणकावून सांगत दुष्काळग्रस्त भागांना शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी खासदार रामराव वडकुते, शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी, जलसंपदा विभागाचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views:
7






