गायत्री कंपनीच्या सुरक्षा कर्मचारी पीएफ प्रकरणी लाखो रुपयांचा घोटाळा ; तीन महिन्यांपासून वेतन नाही
Security Guard PFScam
सुरक्षा कर्मचारी संतप्त, तीव्र आंदोलनाचा इशारा, ४२० चा गुन्हा दाखल करण्याची मागणी
सुपरवाइजर पाटील बंधूकडून भूमिपुत्रांबाबत दुजाभाव
वृत्तवेध ऑनलाईन। १० Aug 2020,
By: Rajendra Salkar, 14 :15
कोपरगाव :गेल्या तीन महिन्यांपासून समृद्धी महामार्ग गायत्री कंपनी व ठेकेदार यांच्यातील अंतर्गत समन्वयाच्या अभावामुळे समृद्धी महामार्गाची कोट्यावधीची मालमत्ता सांभाळणाऱ्या शेकडो सुरक्षा कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यापासून परफेक्ट सिक्युरिटी फोर्स नाशिक यांच्याकडून वेतन मिळाले नसल्याने या कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर गेल्या वर्षभरापासून पीएफच्या बाबद ठेकेदाराकडून फसवणूक केली असल्याची तक्रार सुरक्षारक्षकांनी केली आहे तातडीने वेतन व पीएफ खात्यात जमा न केल्यास या संतप्त सुरक्षारक्षकांनी गायत्री कंपनीच्या गेट समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
समृद्धी महामार्ग गायत्री कंपनीने सुरक्षारक्षक पुरविण्यासाठी चा ठेका परफेक्ट सिक्युरिटी फोर्स नाशिक गौरव शेवाळे यांना दिलेला आहे. या ठेकेदाराने चांदेकसारे या ठिकाणी सुपरवायझर म्हणून मुकेश तुकाराम पाटील व किरण तुकाराम पाटील या दोघा बंधूंची सुपरवायझर म्हणून नियुक्ती केली आहे. एकीकडे कोरोना संकटाच्या बंद काळात सुरक्षारक्षकांचे पगार गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहेत. त्यामुळे शेकडो सुरक्षारक्षकांच्या कुटुंबावर ऐन सणासुदीच्या काळात उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत सुरक्षा रक्षकांचे म्हणणे असे आहे की, ठेकेदाराने आम्हाला नऊ हजार रुपये दरमहा पगार ठरविला असून यातून दोन हजार रुपये पीएफ कपात करण्यात येते व आमच्या हातात सात हजार रुपये वेतन दरमहा दिले जाते. गेल्या वर्षभरापासून आमची कपात होत आहे परंतु आमच्या पीएफ खात्यांमध्ये पैसे जमा झालेले नाहीत. आम्हाला पाटील बंधुनी UNA नंबर ही दिलेला नाही, ज्यांना दिला तर त्यांचा देखील नंबर ओपन होत नाही, ही सरळ सरळ फसवणूक आहे. ज्या सुरक्षा रक्षकांनी या सुपरवायझर पाटील बंधूंना प्रश्न विचारले, त्या सुरक्षारक्षकांना विनाकारण कामावरून काढून टाकण्यात आलेले आहे. स्थानिक भूमिपुत्रांना कामावर घेण्यास टाळाटाळ करणे असे मानसिक त्रास पाटील बंधू देत असतात असेही तक्रारीत म्हटले आहे.
आम्ही आक्रमक पवित्रा घेतला असता सुपरवायझर पाटील बंधूनी पीएफ चे प्रत्येकी १८०० रुपये तातडीने तुमच्या खात्यात जमा करतो असे तोंडी आश्वासन दिले आहे. आणि गेल्या वर्षभरापासून आमची फसवणूक केली आहे. त्यामुळे ठेकेदारावर ४२० फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही सुरक्षारक्षकांनी केली आहे.
रोजगाराच्या संधींअभावी तुटपुंज्या पगारात हे सुरक्षा रक्षक काम करत आहेत. मात्र, त्यांना पगार वेळेत न मिळण्याच्या प्रसंगाचा वारंवार सामना करावा लागत आहे. अनेक महिन्यांत यांना पगार वेळेत हातात मिळत नाही. अशीच परिस्थिती गायत्री कंपनीच्या सुरक्षारक्षकांची झालेली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याला मिळावी यासाठी तीव्र आंदोलनाचा व उपोषणाचा पवित्रा घेतला. असून याबाबत त्यांनी आपला तक्रार अर्ज कोपरगाव पोलीस स्टेशन कोपरगाव तहसीलदार गायत्री कंपनी पीएम व आमदार आशुतोष काळे यांना व आमदार आशुतोष काळे यांना आठवीला आहे. गायत्री कंपनीने आपल्याकडे दोन महिन्याचा पगार शिल्लक असलेले आहे तो आपण दोन दिवसात ठेकेदाराला देणार असल्याचे सांगितले ते कळते.
गेले तीन महिने या सुरक्षा रक्षकांना वेतन मिळालेले नाही. या तीनही महिन्यांचा काळ हा सणासुदीचा काळ होता. या काळात लोकांना पैशाची जास्त आवश्यकता असते. मात्र, एक रुपयाही वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तुटपुंज्या पगारात आधीच तारेवरची कसरत करत कुटुंब चालविणाऱ्या या सुरक्षा रक्षकांकडे ना गायत्री कंपनीचे ना प्रशासनाचे लक्ष आहे.
यावेळी ग्रामस्थ केशवराव होन (माजी. डेप्युटी सरपंच),सुनील होन (ज्ञानेश्वर न्यू इंग्लिश स्कुल अध्यक्ष) डॉ. रोकडे(गाव पोलीस पाटील) आदी हजर होते





