कर्नाटक सरकारने शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला; तो पुतळा पुन्हा त्याच जागी सन्मानाने बसवावा-
कोपरगाव शिवसेनेची मागणी, दिला आंदोलनाचा इशारा
Shivaji Maharaj statue Hatavila

तहसीलदार योगेश चंद्रे यांना शिवसेनेने दिले निवेदन
वृत्तवेध ऑनलाईन।10 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 16 :15
कोपरगाव: मनगुत्ती गावात शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र नतद्रष्ट कर्नाटक सरकारने शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवला, तो पुतळा पुन्हा त्याच जागी सन्मानाने बसवावा अशी मागणी कोपरगाव शिवसेनेने केली असून , आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन शिवसेनेने सोमवारी (१० ऑगस्ट) रोजी दुपारी एक वाजता तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, शहर प्रमुख सनी वाघ, उपनगराध्यक्ष गटनेते योगेश बागुल, विद्यार्थी सेना माजी उपजिल्हाप्रमुख अजिनाथ ढाकणे, उपशहर प्रमुख बालाजी गोरडे, युवासेना उपजिल्हा अधिकारी गणेश जाधव हजर होते.
सीमाभागातील मराठी भाषिकांना नेहमी गळचेपी करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या कृतीमुळे बेळगावातील मराठी भाषिकांमध्ये सध्या संतापाची लाट उसळली आहे. येथील मनगुत्ती गावात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारने रातोरात हटवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी प्रचंड संतापले आहेत. कर्नाटक सरकारच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी कोपरगाव शिवसेनेने तहसीलदार योगेश चंद्रे यांना सोमवारी निवेदन दिले आहे.
मनगुत्ती गावात शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. स्थानिक ग्रामपंचायतीनेही यासाठी आवश्यक परवानगी दिली होती. मात्र, गावातील एका गटाचा या पुतळ्याला विरोध होता. त्यामुळे पोलीस पुतळा हटवण्यासाठी आग्रही होते. अखेर मनगुत्ती गावातील मराठी भाषिक रस्त्यावर उतरल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी नरमाईचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे हा वाद शमला, असे वाटत होते.
मात्र, यानंतरही कर्नाटक सरकारने रातोरात हा पुतळा हटवला. गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करून हा पुतळा हटवण्यात आला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, कर्नाटक सरकारने शिवाजी महाराजांचा हटवलेला पुतळा पूर्ण सन्मानने आहे त्याच जागी त्वरित उभा करावा. अन्यथा आम्हाला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा कोपरगाव शिवसेनेच्यावतीने निवेदनातून देण्यात आलेला आहे.





