पितृशोक झालेल्या शिंगोटे बंधूंची त्यांच्या घरी भेट घेत अमित कोल्हे यांनी केले सांत्वन
Tribute
वृत्तवेध ऑनलाईन। 12 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 15:45
कोपरगाव : दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. शिंगोटे परिवाराच्या दु:खात सहभागी होण्यासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या परिवाराच्या वतीने संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी ओतूर तालुक्यातील गायमुखवाडी येथे जाऊन. शिंगोटे कुटुंबीयांची भेट घेत त्यांनी सांत्वन केले. यावेळी दैनिक पुण्यनगरीचे कोपरगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र सालकर हे त्यांच्याबरोबर होते.
अमित कोल्हे यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता , ओतुर तालुक्यातील गायमुखवाडी येथील दिवंगत मुरलीधर उर्फ बाबा शिंगोटे यांच्या घऱी पोहचले. तिथे त्यांनी बाबा शिंगोटे यांच्या अरविंद शेठ व प्रवीण शेठ या दोन्ही मुलांची व कुटुंबीयांची भेट घेतली. कोल्हे यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांना काळजी घेण्यास सांगितले.
यावेळी अमित कोल्हे म्हणाले, बाबा शिंगोटे यांचा परिचय ज्यावेळेस मी वाचला त्यावेळेस शेतकरी कुटुंबातील सामान्य माणूस कमी शिक्षण असतानाही वृत्तपत्र सारख्या माध्यमांमध्ये अल्पावधीत यशस्वी होतो ही गोष्ट अचंबित करणारी आहे त्यांच्या कर्तुत्वाला सलाम ! या यशामागे त्यांच्या मेहनतीचे व त्यांच्यात असलेल्या प्रामाणिक चिकाटीचे फळ असल्याचे दिसून येते. त्यांच्यामधील विलपावर पाहिल्यानंतर आपण त्यांचे एवढे काम करू शकू का ? असा प्रश्न सातत्याने मनात येत असतो, शून्यातून जग निर्माण करण्याची त्यांची इच्छाशक्ती व १४ तास काम करण्याची क्षमता यामुळेच हे लोक यशस्वी झाल्याचे दिसून येते. अशा लोकांचा परिचय वाचल्यानंतर काम करण्याची एक नवी उमेद निर्माण होते. बळ मिळते.
शिंगोटे परिवारावर कोसळलेल्या दुःखात माजी मंत्री शंकरराव कोल्हे व कोल्हे परिवार सामील आहे. परमेश्वर आपल्याला या दुःखातून सावरण्याची व बाबांनी उभे केलेले कार्य चालविण्यासाठी शक्ती देवो, अशा भावना अमित कोल्हे यांनी व्यक्त करून आज या ठिकाणाहून दुर्दम्य परिस्थितीतही संघर्ष करून यश मिळविण्याची ऊर्जा आपण घेऊन जात असल्याचे सांगून बाबांच्या फोटो पुढे नतमस्तक होत श्रद्धांजली अर्पण केली.