कोविड केअर सेंटरला निधी द्या – आशुतोष काळे
Fund Kovid Care Center – Ashutosh Kale
कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्र्यांकडे मागणी
वृत्तवेध ऑनलाईन। 14 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 16 :05
कोपरगाव : तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असून या कोरोना बाधित रुग्णांना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देता यावी यासाठी एस.एस.जी.एम.येथे सुरु करण्यात आलेल्या व वाढती कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता आत्मा मलिक येथे सुरु करावयाच्या असलेल्या कोविड केअर सेंटरसाठी पुरेसा निधी मिळावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे
एस. पी. कार्यालय अहमदनगर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्याची कोरोनाबाबत परिस्थिती जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्या कोरोना आढावा बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी निधीची मागणी करून येत असलेल्या अडचणींकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. या बैठकीसाठी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह तसेच जिल्ह्यातील खासदार व सर्व आमदार उपस्थित होते.
यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी पालकमंत्र्यांना कोपरगाव तालुक्यातील कोरोनाच्या उपाय योजनांची माहिती दिली. अनलॉकमुळे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त भार पडला आहे. सुदैवाने कोपरगाव तालुक्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. तरीही वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. रुग्ण संख्या वाढल्यामुळे त्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी आहे त्यामुळे डॉक्टरांची संख्या वाढविण्यात यावी. देण्यात येणारा निधी कमी पडत असून या निधीत वाढ करावी व कोपरगाव ग्रामीण रुग्णालयास अद्यावत रुग्णवाहिका मिळावी आदी मागण्या आमदार आशुतोष काळे यांनी या बैठकीत केल्या. सदर मागण्यांना पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.