दारणा धरणातून गोदावरी नदीत साडे दहा हजार क्युसेसचा विसर्ग,
गंगापूर धरणातून ४८ तासांत होणार पहिला विसर्ग; जलसाठा ९३ टक्के
वृत्तवेध ऑनलाईन। 22 Aug 2020, By: Rajendra Salkar, 19 :55
कोपरगाव : आठवडाभरापासून गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे शनिवारी (२२) धरण जवळपास ९३ टक्के भरले. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसात गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात या हंगामातील पहिला मोठा पाण्याचा विसर्ग केला जाणार असून जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागासह सर्व तहसीलदार, महापालिका प्रशासनाला सतर्कतेचा आदेश दिला आहे.
गंगापूर धरणात पावसाचा जोर वाढल्यास कधीही मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जाण्याची श्यक्यता लक्षता घेता गोदावरी नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पूर परिस्थिती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला बचवकार्याच्या सर्व अत्यावश्यक साधनसामग्रीसह ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आले आहे. गंगापूर धरणातून विसर्ग झाल्यास निफाड तालुक्यातील सायखेडा, चांदोरी या गावांना पाण्याचा वेढा पडतो. तसेच शहारात सराफ बाजार, सरदार चौक, म्हसरूळ टेक, आसराची वेस, गाडगेमहाराज धर्मशाळा, नावदरवाजापर्यंत पाणी शिरते. मागील वर्षी ४ ऑगस्ट रोजी थेट नरोशंकर मंदिराची घंटा पाण्यात बुडाल्याने महापूर आला होता.
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील सतर्क रहण्याच्या सूचना मांढरे यांनी दिल्या आहेत. मांढरे म्हणाले, गंगापुर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील आठ दिवसापासुन सलगतेने पाऊस पडत असल्याने गंगापुर जलाशयामध्ये आज ५२०० द.ल.घ.फु. ( ५.१३ टि.एम.सी. ) जवळपास ९२ ते ९३ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे . सद्यस्थितीत पाऊस असाच चालू राहिल्यास जलाशय परिचालन सुचीनुसार निर्धारीत पाणीपातळी व पाणीसाठा राखण्याकरीता पुढील ४८ तासांत गोदावरी नदीमध्ये गंगापुर जलाशयात सांडव्याद्वारे दारणा धरणातून दुपारी ४ वाजता १० हजार ४८६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.