मॅजिक व मिनिडोअरचालकांना व्यवसाय करण्याची परवानगी द्या; कोपरगाव तालुका ऑटोरिक्षा टॅक्सी युनियनची मागणी
वृत्तवेध ऑनलाइन , 25 Aug, 2020
By : Rajendra Salkar 14:00
मॅजिक व मिनिडोअर १ सप्टेंबरपासून सुरू करू द्यावी
कोपरगाव : मॅजिक व मिनिडोअर
चालक-मालकांच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा रोजच्या धंद्यावर अवलंबून आहेत. कोरोनामुळे त्यांच्या धंद्यावर संकट ओढवले आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचा दैनंदिन खर्च भागविता यावा म्हणून १ सप्टेंबरपासून कोपरगावातील सर्व क्षेत्रात मॅजिक व मिनिडोअरचालकांना व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कोपरगाव तालुका ऑटोरिक्षा टॅक्सी युनियनने तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मंगळवारी (२५) रोजी तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संस्थापक राजेंद्र झावरे, अध्यक्ष कैलास जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र सालकर, टॅक्सी सेना अध्यक्ष असलम शेख, रिक्षा सेना अध्यक्ष पोपट झुरळे, मॅजिक व मिनिडोअर अध्यक्ष मल्हारी देशमुख, संचालक गणपत लगड आदी हजर होते.
कोपरगाव तालुका ऑटोरिक्षा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी सांगितले की, लॉकडाउन सुरू होऊन सहा महिने उलटले आहेत. मॅजिक व मिनिडोअरचालक-मालकांच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा रोजच्या धंद्यावर अवलंबून आहेत. कोरोनामुळे त्यांच्या धंद्यावर संकट ओढवले आहे. त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी संघटनेचे संस्थापक राजेंद्र झावरे म्हणाले, कोरोनाचा धोका असतानाही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अनेक चालक जीव धोक्यात घालून मॅजिक व मिनिडोअर चालविण्यास तयार आहेत. जर सरकारने त्यांची उपासमार होणार नाही याची काळजी घेतली तर कोणताही चालक सरकारच्या नियमाविरोधात मॅजिक व मिनिडोअर चालविणार नाही. परवानगी देण्यास काही अडचणी येत असतील तर सरकारने काळीपिवळी मॅजिक व मिनिडोअर चालक आणि मालकांच्या कुटुंबीयांना सरकारने दहा हजारांची मदत करावी, असे ते म्हणाले.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र सालकर म्हणाले, राज्य सरकारने असंख्य बेरोजगार युवकांना मॅजिक व मिनिडोअर परवाना दिला आहे. त्यामुळे त्यांना त्या उत्पन्नावर दैनंदिन गरजा भागविता येत आहेत. परंतु गेल्या सहा महिन्यापासून असे शेकडो मॅजिक व मिनिडोअरचालक घरी बसून आहेत. लॉकडाउनच्या काळात मोठे नुकसान झाले असून त्यांना व्याजासह इएमआय भरावा लागत आहे. मॅजिक व मिनिडोअर चालकांच्या मॅजिक व मिनिडोअर कर्ज आणि त्यावरील कर्ज माफ करावे, अशीही मागणी सालकर यांनी केली आहे.