शेतकऱ्यांना कर्ज नाकारणा-या बँक अधिकाऱ्यांना घेरावा घालून जाब विचारणार – प्रमोद लबडे
वृत्तवेध ऑनलाइन , 25 Aug, 2020
By: Rajendra Salkar 18:30
कोपरगाव : महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतीराव फुले कर्ज माफीच्या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना आधार देऊन कर्जमाफी करतांनाच पुढील पिकांसाठी बँकांनी तातडीने कर्ज द्यावे असा GR काढला मात्र अजूनही राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसून शेतकऱ्यांना मानसिक त्रास देण्याचे काम सुरु आहे अशा बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने कर्ज द्यावे अन्यथा सोमवार दि.३१ ऑगस्ट पासून या अधिकाऱ्यांना घेरावा घालून जाब विचारून ऑफिस मधेच जेरबंद करण्याचा इशारा उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी दिला आहे.
आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले एक आदर्श कर्जमाफीची योजना घेऊन शेतकऱ्यांना आधार दिला मात्र कोपरगाव तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, आशा विविध बँका शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. कर्जमाफीत बसलेल्या शेतकऱ्यांना तसेच नवीन कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांना उडवा-उडवीची उत्तरे देऊन अरेरावीची भाषा वापरून शेतकऱ्यांच्या अस्मितेशी बँक मॅनेजर खेळत आहेत. यावर्षी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे अतिपावसाने पिकांची मोठी नुकसान झाली आहे.
कधी पाऊस नाही तर कधी अतिपाऊस शेतकऱ्यांना सर्व बाजूंनी अडचणी असून कर्जमाफी मिळूनही शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे.
खरिपाची व रब्बीला दरवर्षी वेळेवर शेतकऱ्यांना कर्ज मिळावे याकरिता खा. सदाशिव लोखंडे साहेब यांनी सर्व बँक व्यवस्थापक,लीड बँकेचे अधिकारी यांचे समवेत कोपरगाव येथे बैठकही घेतली होती मात्र सबंधित बँकेचे मॅनेजर शेतकऱ्यांना त्रास देत असून नाबार्डच्या धोरणांनाही बँका केराची टोपली दाखवत आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या तक्रारी लीड बँकेचे मॅनेजर, जिल्हाधिकारी, खा.सदाशिव लोखंडे, कृषिमंत्री दादाजी भुसे, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडेही केलेले असून शेतकऱ्यांना तातडीने कर्ज न मिळाल्यास ३१ ऑगस्ट पासून प्रत्येक शाखेत जाऊन शिवसेना-युवासेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक तसेच शेतकरी सेनेचे सर्व पदाधिकारी संबंधित बँक मॅनेजर ला जाब विचारून त्याला जेरबंद करण्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी दिला आहे.