मोठी बातमी! नगरसेविका वर्षा गंगुले यांच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू
गेल्या ५ दिवसांपासून हिरामन कहार
(गंगुले) यांच्यावर आत्मा मालिक कोविड सेंटर व एसएमबीटी हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
वृत्तवेध ऑनलाईन | 26 Aug 2020, By : RajendraSalkar 14 :10
कोपरगाव :कोपरगाव नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेविका वर्षा गंगुले यांचे पती हिरामन कहार (गंगुले) यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. दोन दिवस आत्मा मालिक हॉस्पिटल येथे उपचार घेतल्यानंतर गेल्या ३ दिवसांपासून हिरामन कहार (गंगुले) यांच्यावर एस. एम. बी. टी. हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
कोपरगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका वर्षा गंगुले यांचे पती व राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुनिल गंगुले यांचे ज्येष्ठ बंधू हिरामण कहार (गंगुले) यांना कोरोनाची बाधा झाल्याने कोपरगाव येथील आत्मा मालिक कोविड सेंटरमध्ये शुक्रवारी ( २१ऑगस्ट) रोजी त्यांना दाखल करण्यात आले होते.
आत्मा मालिक रुग्णालयात उपचार सुरु होते.या ठिकाणी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. परंतु रविवारी (२३ऑगस्ट) रोजी कोरोनामुळे प्रकृती खालावल्याने त्यांना घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटल मधील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. मंगळवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
कोपरगाव गांधीनगर भागातील बल्लाळेश्वर चौकातील रहिवासी असलेले हिरामण कहार (गंगुले) हे आपल्या दोन्ही भावांच्या परिवारासह बारा जणांच्या एकत्रित कुटुंबात राहत होते. हिरामण गंगूले यांच्यासह कुटुंबातील ९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. विशेष म्हणजे त्यांची पत्नी नगरसेविका वर्षा गंगुले, शहराध्यक्ष भाऊ सुनिल गंगुले व जेष्ठ मुलगा दुर्गेश गंगुले या तीन जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. हिरामण कहार (गंगुले) उत्तम खेळाडू व निर्व्यसनी असल्यामुळे त्यांची प्रकृती ठणठणीत होती. अवघ्या पाच दिवसात झालेल्या त्यांच्या मृत्यूमुळे कोपरगाव पुन्हा एकदा हादरले आहे.
दरम्यान, कोपरगावात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या २४ तासांत २७ नवे रुग्ण आढळून आलेत. तर गेल्या पाच महिन्यात आतापर्यंत १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील वाढणारी साखळी खंडित करण्यासाठी लोकाग्रहास्तव शुक्रवार, शनिवार व रविवार हे तीन दिवस कोपरगाव शहर शटरडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
हिरामण कहार (गंगुले) यांच्या मृत्यूबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी आपला ज्येष्ठ सहकारी हरपला अशा शब्दांत भावना व्यक्त करून दुःख व्यक्त केले. हिरामण कहार (गंगुले) यांना माजी आमदार अशोक काळे, आमदार आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संदीप वर्पे , चारुदत्त सिनगर, प्राचार्य मकरंद को-हाळकर, क्रीडाशिक्षक सुभाष पाटणकर सर, दिलीप घोडके सर प्रा.अंबादास वडांगळे, चंद्रकांत शिंदे शहरातील विविध संस्था व पदाधिकारी कोपरगाव कहार समाज यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.