पित्रपंधरवडा; पितृपक्ष (श्राद्धपक्ष) व त्याचे महत्व 

पितृपंधरवडा;

पितृपक्ष (श्राद्धपक्ष)

व त्याचे महत्व

 

वृत्तवेध ऑनलाईन | 1 Sep 2020,
 By : Rajendra Salkar 14:10 

कोपरगाव : धार्मिक कथेत सुद्धा असे सांगण्यात आले आहे कि देवपूजा करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने पितरांची पूजा करावयास हवी. जर पितर खूष असतील तर देव सुद्धा खूषच होतील. ह्या मुळेच भारतीय संस्कृती व समाजात राहणारी लोक स्वतःच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा विविध मार्गाने आदर करतात व त्यांचा मान टिकवून ठेवतात.

विक्रम संवत व इतर भारतीय पंचांगानुसार भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षातील प्रतिपदा ते अमावास्या पर्यंत पितृपक्ष असतो.

कोणत्याही पितरांचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल त्या तिथीस पितृपक्षात श्राद्ध कर्म करण्यात येते. अमावास्येस सर्वपित्री अमावास्या ह्या नावाने संबोधण्यात येत असल्याने ह्या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध कर्म होऊ शकते. सर्वपित्री अमावास्येस महालय अमावास्या असे हि म्हणतात. 
पितृपक्ष म्हणजे काय ?
पितृपक्षास श्राद्धपक्ष ह्या नावाने सुद्धा ओळखण्यात येत असून हिंदू धर्मात त्यास विशेष महत्व देण्यात आले आहे. विक्रम संवत्सरानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षास पितृपक्ष ह्या नावाने संबोधण्यात येते. लोक ह्या पंधरवड्यात आपल्या दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांततेसाठी श्राद्ध तर्पण विधी करतात. ज्यात गाय, कुत्रा व कावळा ह्यांना विविध पदार्थ खाऊ घालण्याची प्रथा आहे. असा समज आहे कि गाय, कुत्रा व कावळ्यास खाऊ घालण्यात आलेले पदार्थ पितरां पर्यंत पोचतात व त्यांच्या अतृप्त आत्म्याची तृप्ती झाल्याने त्यांना विविध प्रकारे शांती मिळते. 
श्राद्ध कसे करावे (पितृपंधरवडा विशेष)
Webdunia
श्राद्धाची वेळ ‘कुपत’ काळ आहे म्हणजेच दिवसाच्या मध्यान्ह काळी (दुपारी 12-30च्या आसपास) श्राद्ध केले गेले पाहिजे. याचे आमंत्रण आदल्या दिवशी पुरोहिताच्या घरी जाऊन आदराने द्यावे. ब्राह्मणांची संख्या एक, तीन, पाच अशी विषम असावी. प्रथम त्यांना हात, पाय धुवायला पाणी द्यावे. नंतर आचमन करून त्यांना आसनावर बसवून प्रेमाने वाढावे. वाढतांना शांत असावे, रागावू नये. मनात श्रद्धा, विश्वास हवा. जेवणानंतर मुख-शुद्धी तसेच दक्षिणा, वस्त्र, रत्न, पात्र या सारखे आपल्या ऐपतीप्रमाणे (यथाशक्ती- दान करावे. ब्राह्मण व आमंत्रितांच्या जेवणानंतर गरीब, तसेच अनाथांनाही संतुष्ट करावे. यामुळे ते यमपुरी (स्वर्गात) जाऊन मृतात्मांची मदत करतात. अनाथाला दिलेले अन्नदान अक्षय होते, असे वराहपुराणात लिहिले आहे. महत्वपूर्ण अशा श्राद्धकर्मात खालील गोष्‍टी महत्वाच्या तसेच पवित्र व पुण्‍यकारक मानल्या गेल्या आहेत, त्या पितरांना अतिशय प्रिय आहेत.
1. काळे तीळ 2. कुतप (मुहूर्त) 3. जानवे 4. चांदी 5. पांढरी फुले 6. दक्षिण दिशा.
काळ्या तिळाने युक्त पाण्याने पिंडाची पूजा व त्यावर सिंचन करावे. हे शक्य नसल्यास तिळाने तर्पण करावे (पृथ्वीवर पितरांना पाणी देणे.) पितर असे म्हणतात, की माझ्या कुळात कोणी असा बुद्धीमान माणूस जन्म घेईल जो पैशाच्या मोहाला बळी न पडता आमच्यासाठी पिंडदान करेल. पैसा असताना आमच्यासाठी रत्न, वस्त्र तसेच सर्व योग्य वस्तूंचे दान करेल किंवा अन्न, वस्त्र यासारखे दान श्राद्धकाळात श्रद्धापूर्वक करेल व शांत चित्ताने ब्राह्मणाला यथाशक्ती जेवायला घालेल किंवा अन्नदान करण्यास अमसर्थ असताना फळ, कंदमुळे भाज्या, दक्षिणा देईल व हेही करण्यास असमर्थ असताना हात जोडून एक मूठभर काळे तीळ देईल किंवा आमच्यासाठी पृथ्वीवर श्रद्धापूर्व सात-आठ तिळांनी युक्त पाण्याचे तर्पण वर करून दुपारी आदराने व भक्तीपूर्वक या मंत्राचे उच्चारण करेल.
नमेऽस्ति वित्तं न धनं
न चान्यच्छाध्दस्य योग्यं स्वपितृन्नतोडसि।
तृप्यन्तु भक्त्या पितरो मयैतो
भुजौ ततो वर्त्मीन भारुतस्य। ।
अर्थ : माझ्याजवळ श्राद्धासाठी लागणारे साहित्य नाही म्हणून मी माझ्या पितरांना नमस्कार करतो. ते माझ्या भक्तीने तृप्ती मिळवतील. मी आपले हात आकाशाकडे केले आहेत. या प्रकाराने श्राद्ध केल्यास पितर संतुष्ट होऊन कर्त्याला संपूर्ण संमुखी जीवनाचा आशीर्वाद देतात.
फळ का मिळत नाही:-
श्राद्धाचे दान योग्य ठिकाणी व योग्य व्यक्तीस न दिल्यास, पारंपरिक पद्धत न पाळल्यास, योग्य दक्षिणा न दिल्यास श्राद्ध फळ मिळत नाही. जे श्राद्ध श्रद्धेने केले नाही, त्यावर दुष्ट प्राण्याची नजर पडली तर ते फळ असुरग्रहण करतात असे म्हटले जाते.
याच प्रकारच्या श्राद्धाचा अधिकारी वामनाने बळीराजाला बनवले. तसेच राम जेव्हा सीतेसह रावणाचा संहार करून परत आले त्यावेळी सीतेने सांगितले की, त्रिजटा आपली भक्ती करते. तेव्हा रामाने त्या राक्षसीला वर दिला की, ज्या श्राद्ध करणार्‍या व्यक्तीच्या घरात चांगली सामग्री, योग्य वि‍द्या व पात्र नाही, सर्व योग्य असतानाही श्राद्ध करत नसेल व जो दक्षिणा देत नाही त्यांचे फळ मी तुला देतो. याचप्रमाणे शंकराने वासुकी नागाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन वर दिला ‘नागराज, ज्या माणसाने श्राद्ध करण्यापूर्वी देवाचे नाव घेतले नाही, योग्य दक्षिणा दिली नाही, देवाब्राह्मणांच्या साक्षीचे उच्चारलेल्या गोष्टी पाळल्या नाहीत. श्राद्ध विधी केला नाही अशा श्राद्ध व यज्ञाचे फळ मी तुला देतो’.
ब्राह्मणाला काही दिले जात असेल तर त्यावेळी कोणाला मनाई करू नये. दान देणार्‍याला थांबवणार्‍यास गुरुहत्येचे पातक लागते. एवढेच नाही तर अशा व्यक्तीकडून दिलेला पदार्थ देव, अग्नी व पतरही ग्रहण करत नाहीत. श्राद्धाचे दान अपात्र, नास्तिक, गुरुद्रोहीला देण्यापेक्षा पाण्यात सोडावे.
श्राद्धाचे पदार्थ :- कु‍त्रा, कोंबडा, डुक्कर आणि अपवित्र व्यक्तींच्या नजरेपासून वाचवावे
पितृपक्ष कशासाठी असतो व श्राद्ध का करण्यात येते ?
पितृपक्षात आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी त्यांना श्राद्ध तर्पण करण्यात येते, ज्यास श्राद्ध कर्म असे संबोधण्यात येते. पितरांच्या मृत्यू तिथीनुसार प्रतिपदा ते अमावास्या ह्या दरम्यान श्राद्ध कर्म करण्यात येते. जर एखाद्या पितराची मृत्यू तिथी माहित नसली तर पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावास्येस तर्पण करता येते. ह्या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध कर्म होऊ शकते. असा समज आहे कि मृत्यू नंतर ज्या पितरांचे नियमानुसार श्राद्ध कर्म होत नाही त्यांच्या आत्म्यास शांती मिळत नाही. 
पितृपक्षा मागे ज्योतिषीय कारणे सुद्धा आहेत. ज्योतिष शास्त्रात पितृ दोष खूपच महत्वाचा समजण्यात येतो. एखादी व्यक्ती जेव्हा यशाच्या जवळपास जाऊन ऐनवेळी अनाकलनीय कारणास्तव हाती आलेले यश गमावून बसते किंवा तीला संततीप्राप्तीत समस्या असते किंवा संपत्तीचा नाश होतो इत्यादी समस्या भेडसावत असतात तेव्हा तज्ञ ज्योतिषी त्या व्यक्तीच्या कुंडलीत पित्रदोष आहे का हे बघतात. असा दोष असता जातकास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पितरांच्या शांतीसाठी पितृदोष विधी करण्याची आवश्यकता भासते. 
हिंदू शास्त्रानुसार पितृपक्षास श्राद्धकर्मा व्यतिरिक्त विशेष असे महत्व सुद्धा आहे. ब्रह्म पुराणानुसार तर्पण (पितरांना भोजन व जल अर्पण करणे) व दान (गरीब व गरजवंतास दान केल्याने पितर संतुष्ट होतात) करण्यास विशेष महत्व आहे. 
पितृपक्षात श्राद्ध कर्म करण्यास पवित्र स्थळ कोठे आहेत ?
भारतात असंख्य पवित्र स्थळे आहेत जेथे जाऊन आपण पितरांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून त्यांची श्राद्धकर्म विधी करू शकता. हिंदू मान्यतेनुसार वाराणसी, गया, केदारनाथ, बद्रीनाथ, नाशिक, रामेश्वरम, यमुनानगर, चाणोद व इतर अनेक पवित्र स्थळे आहेत कि जेथे पितृ तर्पण विधी करण्यात येते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page