निधी मंजुरी तेंव्हाचीच ; पहिला टप्पा संपल्याने, आता दुसर्या टप्पास मंजुरी – विजय वाजे
मा.आ.स्नेहलता कोल्हे यांनीच कामाचा श्रीगणेशा केला होता
वृत्तवेध ऑनलाईन । 2 Sep 2020
By: Rajendra Salkar 19.00
कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेच्या मोडकळीस आलेल्या इमारतीसाठी तात्कालिक आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे ७ कोटी निधीची मागणी केली होती, त्यानुसार नव्या इमारतीच्या कामासाठी २ कोटीचा पहिला टप्पा २४ ऑगस्ट २०१६ ला नगरपालिकेला वर्ग झाला तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नव्या कोपरगाव नगरपालिकेच्या इमारतीच्या भूमी पूजनाची कुदळ मारून कामाचा श्रीगणेशा केला होता. त्याच इमारतीच्या कामासाठी दोन कोटीचा दुसरा टप्पा आता मंजुर झाला असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
सन १९४७ मध्ये स्थापन झालेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या इमारतीची अवस्था अतिशय दयनीय झाली असुन मोडकळीस आलेली होती. नागरीक, अधिकारी आणि कर्मचा-यांच्या वापराच्या दृष्टीने इमारत धोकादायक झाली असल्याने नव्याने बांधण्याची आवश्यकता होती, कोपरगाव नगरपरिषदेचे उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादीत असल्याने नगरपालिकेला इमारत बांधणे शक्य नव्हते, म्हणून माजी आ. सौ स्नेहलता कोल्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री रणजीत पाटील यांचेकडे या इमारतीच्या कामासाठी निधी मिळावा म्हणून मागणी केली होती, अंदाजित खर्च रक्कम रूपये ७ कोटी या इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक असून सदरचा निधी मंजुर करण्यात यावा यासाठी वारंवार पाठपुरावा करून सौ. कोल्हे यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सदरच्या कामास मंजुरी मिळविली, त्यानुसार या इमारतीच्या कामासाठी (दि.२४ ऑगस्ट) २०१६ च्या शासन निर्णयानुसार दोन कोटी रूपयाचा निधीही कोपरगाव नगरपालिकेकडे वर्ग केला, त्यानुसार काम सुरू झाले, याच मंजुर कामासाठी या निधीतील दुस-या टप्प्यातील रक्कम दोन कोटी रूपये मंजुर झाली आहे. सदरची रक्कम नगरपरिषदेसाठी मंजुर झाली असल्यामुळे नगरपरिषदेचे उर्वरीत काम पुर्ण होण्यास मदत होणार असल्याने सदर इमारतीचे काम तातडीने पुर्ण करावे अशी मागणी श्री वाजे यांनी केली.