वैद्यकीय सेवा करीत असतांना पैशाकडे पाहू नका, माणुसकी जोपासा-आ. आशुतोष काळे

वैद्यकीय सेवा करीत असतांना पैशाकडे पाहू नका, माणुसकी जोपासा-आ. आशुतोष काळे

डिपॉझिट साठी उपचार नाकारू नका आत्मा मलिक हॉस्पिटल प्रशासनाला सल्ला

वृत्तवेध ऑनलाइन  ।10 Sep 2020,
By: Rajendra Salkar, 19.00

कोपरगाव : आज संपूर्ण जग कोरोना महामारीच्या सावटाखाली जगत असून आज प्रत्येक व्यक्ती भयभीत झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाही तर वेळप्रसंगी त्या रुग्णाला आपला जीव गमवावा लागत आहे. अशा परिस्थितीत आपल्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांकडे अनामत रक्कम कमी आहे म्हणून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती घेण्यास नाकारू नका. वैद्यकीय सेवा करीत असतांना पैशाकडे न पाहता माणुसकी जोपासा असा सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी आत्मा मलिक हॉस्पिटल प्रशासनाला दिला आहे.

कोपरगाव कोविड सेंटर येथे रुग्णांना दिल्या जात असलेल्या सोयी सुविधांचा आढावा आ. काळे यांनी घेतला. त्याचबरोबर आत्मा मलिक रुग्णालयात पैशाअभावी अनेक रुग्णांना उपचार नाकारण्यात येत असल्याच्या तक्रारीची दखल घेवून त्यांनी आत्मा मलिक हॉस्पिटलच्या प्रशासनाशी चर्चा केली. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ठराविक रक्कमच घ्यावी हे शासनाच्या वतीने बंधनकारक करण्यात आलेली आहे. तेवढीच रक्कम आकारा. आज डॉक्टर सोडून आपल्याला कुणीही वाचवू शकत नाही अशी प्रत्येक कोरोना बाधित रुग्णाची मनस्थिती आहे. अशा वेळी पैशाअभावी कोरोनाबाधित रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवणे योग्य नाही. त्यामुळे यापुढे कोरोना बाधित रुग्णांकडे अनामत रक्कम भरण्यासाठी पैसे कमी असले तरी कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घ्या, तसेच जे कोरोनाबाधित रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरू शकतात अशा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करून घेवून उपचार सुरु करा व नंतर आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घ्या अशा सूचना देखील आ. काळे यांनी यावेळी दिल्या.

आशुतोष काळे यांनी कोपरगाव कोविड केअर सेंटर मधील कोरोना बाधित रुग्णांना देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संतोष विधाते, डॉ. वैशाली बडदे, डॉ. गायत्री कांडेकर, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, सुधाकर रोहोम, गोरक्षनाथ जामदार, संदीप वर्पे, सुनील शिलेदार, राजेद्र वाकचौरे, मेहमूद सय्यद, डॉ.अमोल अजमेरे. डॉ. तुषार गलांडे, सचिन आव्हाड, आत्मा मलिक हॉस्पिटलचे चेअरमन पराग सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित फरताळे, डॉ. शशांक तुसे,डॉ. तुषार साळुंके, विक्रम खटकाळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page