उपक्रमशील शिक्षिका तेजस राजेंद्र वारुळे – शिंदे राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षिका

उपक्रमशील शिक्षिका तेजस राजेंद्र वारुळे – शिंदे राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षिका’

वृत्तवेध ऑनलाईन। Fir 11Sep 20
By : Rajendra Salkar, 8.20

कोपरगाव- महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाने प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये तालुक्यातील कोपरगांव न.पा. शाळा क्र.९ (खडकी)च्या उपक्रमशील शिक्षिका तेजस राजेंद्र वारुळे – शिंदे यांना राजस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष अर्जून कोळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीत पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यातील उपक्रमशील शिक्षकांना संघातर्फे गौरविण्यात येते. विद्यार्थीभिमुख अध्ययन प्रणालीचा अवलंब करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. प्रेरणा पुरस्कार, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, ऑनलाईन शिक्षण आदर्श पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार अशी पुरस्काराची वर्गवारी आहे. पुरस्कारासाठी राज्यभरातून प्रस्ताव मागविण्यात येतात.

तंत्रस्नेही, विद्यार्थीभिमुख अध्ययन, कौशल्य निपुणता आदी निकषांच्या आधारावर प्रस्तावांची पुरस्कार समितीने पडताळणी केली. त्यानंतर शिक्षिका तेजस वारुळे – शिंदे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केले. कोरोनाच्या निर्मूलनानंतर जाहीर कार्यक्रमात शिक्षणमंत्री, राज्य शिक्षण आयुक्तांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती निवड समितीने दिली.

तालुक्याच्या शैक्षणिक वर्तृळात तेजस वारुळे – शिंदे यांची उपक्रमशील शिक्षिका म्हणून ओळख आहे. प्रबोधन, अध्ययन आणि विकास ही वारुळे यांच्या कार्यपद्धतीची त्रिसूत्री राहिली आहे. पालकांचे प्रबोधन करून गरीब तसेच सामाजिक प्रवाहातील होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. शालाबाह्य विद्यार्थ्यांकरीता बालरक्षक म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहे.

डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही बनवले आहे. यू-ट्यूब माध्यमातून दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्मितीमुळे कोरोना संकटातही विद्यार्थी ज्ञानार्जनापासून अलिप्त राहिले नाही.

पुरस्कारासाठीच्या निवडीमुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. उपक्रमशील शिक्षिकेच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आल्याची भावना संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी विशाल झावरे यांनी व्यक्त केली आहे त्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page