नगर-मनमाड महामार्गाची दुरूस्ती करतांना वाहतूक कोंडी नको – आ. आशुतोष काळे
वृत्तवेध ऑनलाईन।Sat12 Sep2020
By : Rajendra Salkar, 16.30
कोपरगाव : नगर-मनमाड महामार्गाची दुरूस्ती करतांना वाहतूक कोंडी नको
अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी सब्डक्शन झोन कन्सल्टंसीच्या अधिकाऱ्यांना रस्त्याची पाहणी करताना दिल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यातून शहराला वळसा घालून जात असलेल्या नगर-मनमाड (रा.मा.१०) या राज्यमार्गावर पडलेल्या लहान-मोठ्या खड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होत होते. याबाबत आ. आशुतोष काळे यांनी जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन दुरुस्ती निधीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे या महामार्गाचे यांच्याकडे मागणी केली होती. त्या पाठपुराव्यातून अहमदनगर ते येवला नाका पर्यंत नुतनीकरणाचे काम लवकरच सुरु होणार आहे. हे काम करतांना या राज्यमार्गावर पुणतांबा चौफुली, संत जनार्दन स्वामी आश्रम, बेट नाका, श्री साईबाबा चौफुली, येवला नाका आदी ठिकाणी वाहनांची गर्दी होवून वाहतूक कोंडी होत असते. या ठिकाणी असलेले शाळा-महाविद्यालय,औद्योगिक वसाहत व कारखाना परिसर व रेल्वे स्टेशन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होवून विद्यार्थ्यांना व पादचाऱ्यांना या वाहतूक कोंडीतून जीव मुठीत घेवून हा महामार्ग पार करावा लागतो अशा वेळी या ठिकाणी अनेक अपघात देखील घडलेले आहेत. त्यामुळे नुतनीकरण करतांना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी कन्सल्टंसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यावेळी सुधाकर रोहोम, कन्सल्टंसीचे अनुप सूर्यवंशी, तानाजी चिटे, अभियंता प्रशांत वाकचौरे, नगरपरिषदेचे दिगंबर वाघ, संदीप शिरोडे, राजेंद्र जोशी, राहुल चांदगुडे, सचिन गवारे, सोमनाथ आढाव, निलेश पाखरे आदी उपस्थित होते.