अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात प्रशासनाकडून दुजाभाव का ? – आप्पासाहेब जावळे
आठ दिवसापासून बत्तीही गुल
वृत्तवेध ऑनलाईन।Sun13 Sep20
By : Rajendra Salkar, 16.30
कोपरगाव : गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे सोनेवाडी परिसरातही मोठे नुकसान झाले . गोदावरी उजव्या कालव्याच्या कडेला असलेली शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली त्यामुळे उभी पिके जमीनदोस्त झाली. पंचक्रोशीच्या काही भागात प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम चालू आहे. मात्र सोनेवाडीला झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाचा दुजाभाव का ? असा सवाल अतिवृष्टीने बाधित झालेली शेतकरी आप्पासाहेब जावळे यांनी केला आहे.
सोनेवाडी येथे गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वे नंबर ७३/१ मधील आप्पासाहेब मोहन जावळे यांचे तीन एकर क्षेत्र पूर्ण पाण्याखाली आले. त्यांचे राहण्याचे घर ही पाण्याने वेढले गेले. कांदा चाळ भिजून त्याचेही नुकसान झाले. दोन एकर सोयाबीन मध्ये जवळपास सोयाबीन बुडेल इतके पाणी होते त्यामुळेही सोयाबीन काढण्याच्या परिस्थिती राहिली नाही. तर एक एकर उभा असलेला उस देखील उपळून गेला आहे.सोनेवाडी ते पंचकेश्वर रस्त्यावर पूर्ण पाणी असल्यामुळे दळणवळण नाही रोखले गेले. जावळे यांच्यात बाजूला असलेल्या रंभाजी भागवत गुडघे, रामदास गजाराम जावळे, भिकाजी भागवत जावळे ,त्र्यंबक बाबुराव दहे, सोमनाथ त्रिंबक दहे, अण्णासाहेब पंढरीनाथ दहे, विठ्ठल बाबुराव दहे आदी शेतकऱ्यांची सोयाबीन मका ऊस पिके पूर्ण पाण्याखाली गेली असून ती उद्ध्वस्त झाली आहे. तर गाईंना केलेला मुरघास व गाईच्या गोट्यालाही पाणी लागल्यामुळे जनावरांच्या निवाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला.
अप्पासाहेब जावळे यांनी ग्रामपंचायत सोनेवाडीला ही माहिती कळविल्यानंतर सरपंच गंगाराम खोमणे, उपसरपंच किशोर जावळे, जनार्दन खरात, कांतीलाल लांडबले त्यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ताबडतोब जेसीबी मशिनच्या साह्याने नळी खोदत पाणी काही प्रमाणात कमी केले. सतत होत असलेल्या पावसाने आधीच हैराण झालेले शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीनेही त्रास द्यायचे सोडले नाही.
गेल्या आठ दिवसापासून हे कुटुंब राहत असलेल्या वस्तीवर विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे मोठ्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. आतातरी प्रशासनाने या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे व विद्युत पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.