शहरातील प्रत्येक प्रभागात एक तरी क्रीडांगण असावे,
पालिकेची जागा व्यावसायिकांच्या घशात,
वृत्तवेध ऑनलाईन। Mon14Sep2020
By: Rajendra Salkar, 17.09
कोपरगाव : शहरातल्या लहान – मोठ्या प्रत्येक खेळाडू आणि क्रीडाप्रेमीला खेळानुसार मैदाने आणि सुविधांची गरज आहे. सुविधा तर सोडाच, पण असलेल्या मैदानांची देखभाल न करता उलट ती नष्ट करून कशी बळकावता येतील याचे डोहाळे काहींना लागलेले दिसतात. नेते मंडळी भाषण ठोकताना खेळाचे महत्त्व पटवून देतात. खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव करतात. आश्वासन द्यायला तर अजिबात मागेपुढे पाहत नाहीत. प्रत्यक्षात मात्र मैदाने जोपासणे, खेळानुसार सुविधा पुरवणे आणि नव्याने मैदाने विकसित करून मुलांनी त्यांच्यातील क्रीडागुणांसह उत्तुंग भरारी मारावी, यात लोकप्रतिनिधी व प्रशासनास स्वारस्य नाही. ही शोकांतिका आहे. त्यांचे क्रीडाविषयक बेगडी प्रेम पाहता, मैदानातील मातीची त्यांना अॅलर्जी आहे की काय, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.
क्रीडा संस्कृतीची जोपासना हे सर्वागीण समतोल सामाजिक विकासाचे एक महत्त्वाचे अंग. याच व्यापक भूमिकेतून, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समितीने काही सूचना केल्या आणि शासनाने त्याला राज्यमान्यता दिली.
मैदाने वाचवा व मैदाने जोपासा’ हा तर खेळांचा आत्मा. मोकळी मैदाने उपलब्ध नसतील तर खेळांचे प्राथमिक धडे कुठे गिरविले जाणार? पण या मूलभूत प्रश्नास ना सत्ताधारी पक्ष सामोरा जातोय ना विरोधक त्याचा आग्रह धरत आहेत!
मोकळी मैदाने ही देशाची मुलभुत गरज आहे. खेळांसाठी आणि नागरिकांच्या मोकळ्या श्वासासाठी! मैदाने ही तर राष्ट्रीय संपत्ती असून आबालवृद्धांसह सारा स्त्री पुरुष समाज मनानं खिलाडू व खेळकर आणि शरीरानं कणखर व निरोगी असावा यासाठी मैदानांना चैतन्यमय बनवायला नको का? त्यासाठी शालेय व केंद्रीय अभ्यासक्रमात खेळ व व्यायाम हा विषय सक्तीचा असला पाहिजे.
विद्याथीर्वर्गावर अभ्यासाचं, ट्युशन्सचं असह्य ओझं पडणार नाही आणि मोबाईलमुळे बालपिढी घरकोंबडी, चष्मीस व अकाली निष्क्रिय बनणार नाही, याची खबरदारी घेणारी नवी शिक्षणपद्धती राबविण्याची गरज आहे. मुलांचे पाय मैदानाकडे वळावेत, अशी मैदाने तयार करण्याची खरी गरज आहे.
पालिकेने काही उद्याने, मैदाने खाजगी संस्थांना दत्तक तसेच देखभालीसाठी दिली आहेत. पण सर्वच संस्था आपले काम चोखपणे करतात असे नाही.
बहुतेक संस्थांच्या शाळा म्हणजे वर्ग निर्माण करणाऱ्या इमारतीच आहेत. बहुधा चार भिंती आत खडू फळा आणि शिक्षण या माध्यमातून दिले जाते तेच शिक्षण! प्रगती पुस्तकातील गुणांची संख्या वाढणे, हेच विद्यार्थ्यांच्या हुशारीचे लक्षण!! असे साचेबंध राहणे, हे ही काही शैक्षणिक संस्थांचे उद्दीष्ट असावे. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची जडणघडण ही मोकळ्या वातावरणात समुहाने वावरल्याने, बौद्धिकतेला शारीरिक खेळांची जोड दिल्याने परिपूर्ण होते ही वस्तूस्थिती आहे.
तेव्हा शहरातील प्रत्येक प्रभागात एक तरी क्रीडांगण असावे, हे शहरातील प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे यासाठी नगरसेवक व पालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे.