नगराध्यक्ष आमदारांचे पीए म्हणून काम करतात काय ?- विजय वाजे
सात महिन्यात दोन कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या तर एकाचा कोरोना ने मृत्यू
वृत्तवेध ऑनलाईन। Thu 17Sep20
By: Rajendra Salkar, 17.20
कोपरगाव : नगराध्यक्ष वहाडणे हे आदरणीय आहेत त्यांच्यावर टीका-टीप्पणी करण्याएवढा मी मोठा नाही. पण ते जेंव्हा आम्हीच या थाटात आमदारांबरोबर जावून गोकुळ नगरी पुलाचे उदघाटन करतात तेव्हा त्या खोटारडेपणा चे दु:ख झालं. नगराध्यक्ष आमदारांचे पीए म्हणून काम करतात काय ? असा प्रश्न निर्माण झाला. तेंव्हा स्पष्टपणे त्यावर प्रतिक्रिया देणे गरजेचे आहे असं माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे पत्रकार परिषदेत म्हणाले.
शहरात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे वहाडणे + राष्ट्रवादी काँग्रेस+ सेना (काळेगट) व भाजप + सेना ( कोल्हेगट) यांच्यातील राजकारण चांगलचं रंगू लागलं आहे. सोमवारी झालेल्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेवरून भाजप + सेना ( कोल्हेगट) यांनी वहाडणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस+ सेना (काळेगट) यांच्यावर टीकेचा भडिमार केला याच अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष वहाडणे यांच्या मनमानी व दहशतीच्या कारभाराचा जोरदार समाचार माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी घेतला आहे.
याबाबत विजय वाजे म्हणाले की, आठ महिन्यांनी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत कोरोना संकटात कर्मचारी, नगरसेवक व नागरिकांचा बळी गेला यावर चकार शब्द नाही. मात्र पैसे मिळावे म्हणून आरक्षण उठविणे, घंटा गाडी खरेदी करणे, महामार्गावर पोल बसवणे हे विषय आवर्जून घेतले, दुसरीकडे पाणी समितीमध्ये ४९ कोटीचा योजनेचे वॉटर ऑडिट करण्याचा मंजूर झालेला ठराव सभापती स्वप्निल निखाडे यांनी पत्र देऊनही विषय पत्रिकेवर घेतला नाही, कायदा मोडला, ऑनलाइन वर ऐकू येत नाही विषयपत्रिकेवरील क्रीडांगणाचे आरक्षण व पाच नंबर साठवण तलाव हे महत्त्वाचे व मोठे विषय होते यावर समोरासमोर बसून ऑफलाइन चर्चा करण्याच्या मागणीला नगराध्यक्षांनी केराची टोपली दाखवली व मनमानी पद्धतीने सभा सुरु ठेवली. अशा शब्दात वाजे यांनी वहाडणेंचा समाचार घेतला.
तसेच राजकारणाचा व्यापार मांडताना नीतिमत्तेचे धडे देताना आपण किती नैतिकतेवर काम करतोय ते पाहावं.
दहशती पायी सात महिन्यात दोन कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाली एका कर्मचाऱ्याचा कोरोना ने मृत्यू झाला आता नगरसेवकांच्या आत्महत्या ची वाट पाहता का ? असा संतप्त सवाल वाजे यांनी केला. याठिकाणी काय घडतं ते सगळ्यांनाच दिसत आहे. ही राजकारणाची वेळ नाही पण एकीकडे लोकांची उपासमार होत आहे. खोका शॉप तयार होत नाही, घरपट्टी नळपट्टी माफीचा विषय घेतला जात नाही, तुम्ही एक कुटुंब प्रमुख आहात काटकसर करा, असा खोचक टोला वाजे यांनी लगावला.
वाजे म्हणाले, गोकुळ नगरी पुल कोणी केला आहे हे लहान पोरगंही सांगेल असे असताना त्याचे उद्घाटन केले. याची किव कराविशी वाटते, धारणगाव रोडच्या केलेल्या कामाच्या पैशासाठी अनिल सोनवणे चकरा मारतात आणि तुम्ही इकडे त्याच रोडचे नवीन टेंडर काढतात ते कसे ? घरपट्टी नळपट्टी पट्टीला दंड म्हणून शास्ताकर आकारला जातो तो महिन्याला दोन टक्के म्हणजे वर्षाला २४ टक्के आकारला जातो आहे ही जनतेची लूट होत आहे. यावर बोलायला तयार नाही. सभेत कोणते विषय घ्यायचे याबाबत मुख्याधिकार्यांना विचारलं तर ते म्हणतात हा माझा अधिकार नाही, मग यांचा अधिकार नेमका काय आहे ? असे अनेक प्रश्न वाजे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले





