तुर्तास निकष बाजूला ठेवा, शेतकऱ्यांना मदत द्या-आ. काळेंची मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे मागणी
वृत्तवेध ऑनलाईन। Thu24Sep2020
By: Rajendra Salkar, 18.10
कोपरगाव : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दखल घेवून निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देवून दिलासा द्यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मदत, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.
संपूर्ण राज्यासह कोपरगाव विधानसभा मतदार संघात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, कापूस, आदी उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी जून महिन्यापासून सुरु झालेल्या पावसाळ्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, कोरोना संकटामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसतांना देखील अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पिके उभी केली होती. अनुकूल हवामान व वेळेवर झालेल्या पर्जन्यमानामुळे सर्वच पिकांचे भरघोस उत्पन्न मिळेल अशी सर्वत्र परिस्थिती होती. मात्र होत असलेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. २०१९ मध्ये देखील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
मागील काही वर्षापासून अस्मानी व सुलतानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना उमेद देवून त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. संपूर्ण मतदार संघात दररोज होत असलेल्या अतिवृष्टीमुळे सर्व ओढे नाले फुटून पाणी सखल भागातील शेतातील उभ्या पिकात साचून राहत असल्यामुळे पिके सडून चालली असून निकष बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी आग्रही मागणी आ आशुतोष काळे यांनी केली आहे.