कार्य कर्तुत्वाचा ठसा: मोहन यादव

कार्य कर्तुत्वाचा ठसा: मोहन यादव

वृत्तवेध ऑनलाईन। Sat26Sep2020
By:RajendraSalkar,15.00

कोपरगाव : चतुरस्र व्यक्तीमत्व मोहन यादव यांचा ज्याप्रकारे मृत्यू झाला ते क्लेशदायक आहे. मोहन यादव व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रसन्न, सोज्वळ हसरा चेहरा, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वल्हेवाडी वावी हे त्यांचे मूळ गाव. घरची परिस्थिती अत्यंत बेताची.मात्र जन्म, आणि महाविद्यालयीन शिक्षण व पुढची सर्व कारकीर्द कोपरगावात घडली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा आणि शिका योजनेतून त्यांनी एस जी एम कॉलेज कोपरगाव येथून शिक्षण पूर्ण करत ग्रंथपाल कोर्स उत्तीर्ण केला. त्यानंतर ते संजीवनी सांस्कृतिक मंडळ सहजानंदनगर येथे काम पाहू लागले. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूट या शिक्षण संस्थेत ग्रंथपालपदी त्यानंतर ते रुजू झाले. सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षण संस्था संजीवनी क्रिकेट ट्रेनिंग सेंटरला मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी काम केले. एका दैनिकाचे कोपरगाव वार्ताहर म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती. अनेक जणांना त्यांनी मदतीचा हात दिला स्वतः प्रत्येकाच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत असत यशाची एक एक शिखरे त्यांनी अत्यंत नम्रपणे हाताळली, त्यामुळेच ते संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूटमध्ये सचिव झाले.

त्यानंतर ते साईबाबा संस्थान शिर्डी येथे ग्रंथपाल पदी रुजू झाले. त्यातून त्यांची साईबाबा संस्थान शिर्डीचे जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. गेल्या पंधरा वर्षांपासून ते या पदाची धुरा सांभाळत होते भारत देशासह संपूर्ण जगभर साईबाबांच्या प्रसिद्धीचे काम त्यांनी अत्यंत नेटाने सांभाळले. श्री साईबाबा संस्थान च्या माध्यमातून  जनसंपर्क अधिकारी म्हणून  त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा त्यांनी जगभर उमटविला. एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे देवस्थान श्री साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन जगन्नाथ यादव (५५) यांचे नाशिक येथील अपोलो रुग्णालयात मेंदूत रक्तस्राव झाल्याने निधन झाले, कोविड झाल्याने त्यांच्यावर तेथे उपचार सुरू होते त्यांच्या मागे पत्नी सुरेखा, एक मुलगा यश, एक मुलगी श्रद्धा, असा परिवार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page