शिवसेनेचे योगेश बागुल यांचा उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा

 शिवसेनेचे योगेश बागुल यांचा उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा

वृत्तवेध ऑनलाइन।Thu Oct8,2020
By: RajendraSalkar,1.30

कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष  शिवसेनेचे योगेश बागुल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपला एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला असून इतर नगरसेवकांनाही उपनगराध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळावी अशा भूमिकेतून आणि भारतीय जनता पक्षाचे स्थानिक श्रेष्ठी कोल्हे यांना  दिलेल्या शब्दानुसार  आपण या पदाचा राजीनामा देत असल्याचे बागुल यांनी सांगितले. तसाही आपला एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झालेला होता.

गुरुवारी सकाळी ११ वाजता उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी उपमुख्याधिकारी सुनील गोरडे यांच्याकडे आपला राजीनामा दिला. यावेळी योगेश बागुल यांच्याबरोबर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, आरोग्य सभापती अनिल उर्फ कालूआप्पा आव्हाड, नगसेवक अतुल काले हे होते.

बागुल यांच्या राजीनाम्याबद्दल उपमुख्याधिकारी सुनील गोरडे यांना विचारले असता ते म्हणाले, बागुल यांचा राजीनामा मंजूर केला असून नगराध्यक्ष यांची सही घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. बागुल यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयास पुढील कार्यवाहीच्या माहितीसाठी कळविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या १५-१६ ऑक्टोबर पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडून उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक ऑनलाईन होणार की कशी हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी ती ऑनलाईनच होण्याची शक्यता जास्त आहे असेही त्यांनी सांगितले. उपनगराध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळे योगेश बागुल नियोजन व शहर विकास समितीच्या पदसिद्ध सभापतीपदावरही आता ते नाहीत. आता शिवसेना गटनेते म्हणून त्यांच्यावर स्थायी समिती सदस्य ही जबाबदारी राहिली आहे. भारतीय जनता पक्ष संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे अर्थात कोल्हे गट उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी कुणावर सोपविणार याबाबत नगरसेवक व कार्यकर्त्यांमधे उत्सुकता आहे. नगरपालिका निवडणूक उंबरठ्यावर आल्यानंतर योगेश बागुल यांनी दिलेल्या राजीनाम्याला विशेष महत्त्व आले असून कोणाच्या गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 योगेश बागुल यांच्या राजीनाम्यावर बोलताना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव म्हणाले, शिवसेना-भाजप युती असून शिवसेनेला एक वर्ष उपनगराध्यक्ष पद देण्याचे आश्वासन संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिले होते. त्याप्रमाणे एक वर्ष पूर्ण झाले असून कुठल्याही प्रकारची नाराजी नाही, ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला आहे. उलट कोरोनामुळे राजीनामा देण्यास काही महिने उशीर झाला असल्याचेही कैलास जाधव यांनी सांगितले .

Leave a Reply

You cannot copy content of this page