पाच नंबर तळयासाठी निधी देणार ना. तनपुरेंची आ. काळेंना ग्वाही
वृत्तवेध ऑनलाइन।Fri Oct9,2020
By: RajendraSalkar,9.00
कोपरगाव : पाच नंबर साठवण तलाव व हद्दवाढ भागासाठीच्या वाढीव पाईपलाईन योजनेला नगरविकास खात्याकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनी आमदार आशुतोष काळे यांना मंत्रालयात गुरुवारी (दि.८) रोजी झालेल्या बैठकीत दिली. बैठकीत मतदार संघातील विविध विकासकामांवर सकारात्मक चर्चा झाली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहकार्यातून गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीच्या मदतीने कोपरगाव शहरातील पाच नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदाई काम पूर्ण करण्यात आमदार आशुतोष काळे यशस्वी झाले आहे. मात्र या साठवण तलावात भविष्यात पाणी साठविण्याच्या दृष्टीने या साठवण तलावाचे यापुढील काम होणे अत्यंत गरजेचे आहे. या कामाचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला नगरविकास खात्याने मंजुरी देऊन तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार काळे यांनी ना.प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली होती.
यावेळी आमदार काळे यांनी विधानसभा मतदार संघात अनेक गावांमध्ये सरकारी जागा उपलब्ध असून या जागेवर सोलर पॉवर प्लांट उभारून घरगुती व शेती पंपासाठी वीज उपलब्ध करून द्यावी. कोपरगाव शहरातील उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी ५५ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झालेला असून त्याबाबत कोणतेही काम पूर्ण झालेले नाहीत. त्याची चौकशी करून कार्यवाही करावी. मतदार संघात नवीन कृषीपंप कनेक्शन बाबत एकूण १५७० शेती पंपाचे नवीन अर्ज प्रलंबित असून त्या ग्राहकांना तातडीने कनेक्शन मिळावे. ओव्हरलोड रोहीत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात असून सदरच्या रोहित्रावर असलेला ओव्हरलोड कमी करण्यासाठी नवीन रोहित्र मिळावे. जल जीवन योजनेसाठी घातलेली १०% लोकवर्गणीची अट रद्द करावी. तसेच धारणगाव पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित करून रांजणगाव देशमुख पाणी पुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी नगरविकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे व पाणीपुरवठा राज्यमंत्री नामदार संजय बनसोडे यांच्याकडे केली.





