ना. गडकरी यांच्याकडे सावळीविहीर फाटा – कोपरगाव रस्त्यासाठी १०५ कोटीची आ. आशुतोष काळेंची मागणी
वृत्तवेध ऑनलाईन।27Oct2020
By:Rajendra Salkar, 20:00
कोपरगाव : विधानसभा मतदार संघातुन जात असलेल्या नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गासाठी (एन.एच.७५२ जी) १०५ कोटी रुपये निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्तेविकास मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.
दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे कि, नगर-मनमाड राष्ट्रीयमार्ग हा अक्षरशः मृत्यूचा सापळा झालेला आहे. या रस्त्यावर सावळीविहीर फाटा ते कोपरगाव मार्गावर मोठमोठी खड्डे पडल्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. पूर्वीचा हा रस्ता प्र.रा.मा. ८ हा नगर-मनमाड पर्यंत होता. डिसेंबर २०१९ पर्यंत या मार्गावर नगर ते कोपरगाव टोल वसुली केली जात असल्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करणे शक्य होते. परंतु डिसेंबर २०१९ पासून टोल वसुली बंद झाल्यामुळे व यावर्षी मोठ्याप्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
सिन्नर, शिर्डी, अहमदनगर, दौंड, बारामती, पैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग १६० मंजूर करण्यात आल्यामुळे सावळीविहीर फाटा ते अहमदनगर या मार्गाचा समावेश राष्ट्रीय महामार्ग १६० मध्ये झाला आहे. त्यामुळे सावळीविहीर फाटा, कोपरगाव ते मनमाड या मार्गाला एन.एच.७५२ जी क्रमांक मिळाला असून या मार्गासाठी निधी तरतूद झाली नसल्यामुळे या मार्गाचे भावितव्य टांगणीला लागले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या क्षेत्रात येणारा सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या १० किलोमीटरचा चौपदरीकरण, अंडरपास तसेच उड्डाणपूल उभारणीसाठी एकूण १०५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे सदर मार्गावर वाहन धारकांची होत असलेली गैरसोय याची आपण दखल घ्यावी व होत असलेले अपघात टाळण्यासाठी या मार्गाची तातडीने दुरुस्ती व्हावी यासाठी १०५ कोटी रुपये निधी द्यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्तेविकास मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
चौकट:- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांच्याकडे या मार्गाच्या झालेल्या दुरावस्थेबाबत कैफियत मांडली होती. त्यावेळी सार्वजनिक मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन खड्डे बुजविण्यासाठी निधी मंजूर केला होता. याची अंबलबजावणी होऊन हे खड्डे बुजविण्याचे काम तातडीने सुरु होणार आहे. – आमदार आशुतोष काळे.