सॉर्टेड सिमेन आजपासून दूध उत्पादक सभासदांना ६०० रुपयात – राजेश परजणे
वृत्तवेध ऑनलाईन।31ct2020
By:Rajendra Salkar, 16:20
कोपरगांव : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव व अतिवृष्टीमुळे पशुपालकांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची दखल घेवून गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघ व बायफ ( बी. आय. एस. एल. डी.) संस्थेच्या संयुक्त सहकार्याने दूध उत्पादक सभासदांसाठी आजपासून १ नोव्हेंबर पासून ९०० रुपयांऐवजी आता ६०० रुपये दराने सॉर्टेड सिमेन उपलब्ध करुन देण्याची महत्वपूर्ण घोषणा संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी ‘बायफ कामधेनू’ योजनेचा शुभारंभी केली. बायफ कामधेनू ‘ फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बायफचे राज्य विभागीय संचालक व्ही. बी. दयासा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, बायफचे मुख्य कार्यक्रम समन्वयक डॉ. सुधीर वागळे, संघाचे संचालक राजेंद्रबापू जाधव, नाशिक बायफ कार्यालयाच्या अधिकारी नीधी परमार, डॉ. निशिकांत भंगाळे,
पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे, कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे, विभागीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जिगलेकर, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे कार्यक्रम समन्वयक डॉ. चंद्रकांत धंदर आदी उपस्थित होते. डॉ. सुधीर वागळे यांनी प्रास्ताविक केले.
परजणे पुढे म्हणाले, संघाच्या कार्यक्षेत्रात एकूण ३५ कृत्रिम रेतन केंद्रे कार्यरत असून त्यामार्फत सॉर्टेड सिमेन रेतनाचे काम चालते. १८० कृत्रिम रेतनाचे उद्दिष्ट पूर्ण केल्यास त्यापुढील कृत्रिम रेतनासाठी प्रती ५० रुपये अधिक दर दिला जातो. गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील कृत्रिम रेतन उपक्रम, जनावरांचे आजार, प्रयोगशाळेतून पशुरोग निदान यासंदर्भात दूध उत्पादकांना माहिती पुरविण्यासाठी कॉलसेंटर सुरु करण्यात येणार आहे. संघाने सुरु केलेल्या पशुरोग निदान प्रयोगशाळेत जनावरांच्या १९ आजारांचे निदान केले जाते. सभासदांसाठी ही सेवा अत्यंत माफक दरामध्ये उपलब्ध करुन
देण्यात आलेली आहे. आतापर्यंत या प्रयोगशाळेमध्ये तीन हजाराहून अधिक तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. संघास दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांची नोंदणी करुन त्यांना बायफ कामधेनू योजनेचे स्मार्ट कार्ड
देण्यात येवून संघाकडील व बायफ कामधेनू योजनेतील सर्व सोई सवलतीचा त्यांना नाममात्र शुल्कात लाभ घेता येणार आहे. कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांना आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने प्रती १०० दूध उत्पादकांसाठी बायोगॅसची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी अनुदान देखील उपलब्ध करुन दिले जाणार आहे. सन २०१६ ते २०२० या कालावधीत सॉर्टेड सिमेनचे ४७३४ कृत्रिम रेतन झालेले असून त्यापासून १५८७ कालवडी तर १५४ गोहे जन्मास आलेले आहेत. जन्मलेल्या कालवडींपैकी ६९ कालवडी वेतात आलेल्या असून त्यांची दुधाची सरासरी २५ लिटरपेक्षाही अधिक आहे. नियमीत कृत्रिम रेतनामध्ये कालवडींचे जन्माचे प्रमाण केवळ ५० टक्के इतके असते त्यापेक्षा सॉर्टेड सिमेनमुळे जन्मलेल्या कालवडींचे प्रमाण सुमारे ९३ टक्के इतके आहे. सॉर्टेड सिमेनपासून जन्मलेल्या कालवडी यापुढे संघाच्या परवानगीशिवाय शेतकऱ्यांना विकता येणार नाही असेही श्री परजणे पाटील यांनी सांगितले.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी लम्पी स्कीन डिसीज या आजाराबाबत माहिती दिली. हा रोग प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना ( गाई, वासरे, कालवडी, बैल ) होणारा विषाणुजन्य साथीचा आजार आहे. या रोगाचा संसर्ग एका जनावरापासून दुसऱ्या जनावरापर्यंत पोहोचतो. लम्पी रोगामुळे जनावरांच्या मरतूकीचे प्रमाण नगन्य असले तरी, बाधित जनावरे अशक्त होत जातात. दूध उत्पादनात मोठी घट होते. जनावरांची कार्यक्षमता खालावली जावून काही वेळा गर्भपातही होतो. या रोगाची लस गोदावरी दूध संघ लवकरच उपलब्ध करुन देणार असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही डॉ. तुंबारे यांनी केले.
याप्रसंगी विभागीय संचालक व्ही. बी. दयासा यांनी बायफ कामधेनू योजनेची सविस्तर माहिती देवून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. संघाचे मयत कर्मचारी बळीराम आहिरे यांच्या वारसांना अपघात विम्याचा धनादेश स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक बिजय प्रसाद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास संघाचे संचालक, दूध संस्था चालक, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. डॉ. निशिकांत भंगाळे यांनी केले तर कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी आभार व्यक्त केले.