ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या सोडवा – महात्मा फुले समता परिषद
वृत्तवेध ऑनलाईन।31ct2020
By:Rajendra Salkar, 16:00
कोपरगाव : मागील अनेक वर्षापासून ओबीसी समाजाच्या मागण्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करून देखील या मागण्या आजपर्यंत मान्य करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या मागण्या तातडीने मान्य कराव्या अशा आशयाचे निवेदन महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे यांना नुकतेच देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि, राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ५२ टक्के लोकसंख्या मागास वर्गात असून राज्यातील इतर मागास वर्गीय प्रवर्गातील संख्या विचारात घेऊन महाज्योती या संस्थेकरिता २५० कोटी निधी द्यावा. राज्य मागासवर्ग आयोगावर इमाव /विजाभव/ओबीसी या प्रवर्गातीलच व्यक्तींची नेमणूक करावी. राज्य शासनाच्या विविध विभागात मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती करण्याचा निर्णय घ्यावा. इमाव /विजाभव/विमाप्र विद्यार्थ्यांची मागील वर्षाची शिष्यवृत्ती प्रलंबित असून २०२०-२१ यावर्षासाठी २ हजार कोटींची तरतूद केली असून सदर शिष्यवृत्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. इतर मागासवर्ग विकास महामंडळाचे भागभांडवल विविध योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जातो मात्र आज रोजी महामंडळाकडे भागभांडवल उलब्ध नाही त्यामुळे या भागभांडवलाट ५०० कोटीची वाढ करावी. ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश मिळावा यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करावी अशा ओबीसी समाजाच्या हिताच्या अनेक मागण्या दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. ओबीसी समाजाचे वतीने हे निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे तसेच आमदार आशुतोष काळे यांना महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हे निवेदन देण्यात आले असून ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. या प्रसंगी उपस्थित समता परिषदेचे प्रांतिक सदस्य पद्माकांत कुदळे ,ज्योती बँकेचे चेअरमन राविकाका बोरावके ,शेतकरी संघाचे अध्यक्ष वाल्मिक भास्कर, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष बापू वढणे, शहर अध्यक्ष विशाल राऊत, कार्यकारनी सदस्य संदीप बागल, माळी बोर्डिंग चे अध्यक्ष बाळासाहेब पांढरे, राजेंद्र गिरमे, भाऊसाहेब भाबड , टिक्कल सर, राहुल देवळालीकर, रावसाहेब साठे, राजेंद्र पगारे, राष्ट्रवादी विध्यार्थी शहर अध्यक्ष स्वप्नील पवार, दत्तोबा जगताप, बाबा रासकर, चंद्रशेखर भोंगळे, संदीप वढणे, सुनील गिरमे, संतोष जाधव आनंद जगताप, गिरीश हिवाळे, क्षीरसागर , सुमित भोंगळे आदिंसह ओबीसी समाज बांधव उपस्थित होते..